पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प;
शिरोली : गेली पाच-सहा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शिये बावडा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. ती वाहतूक तावडे हॉटेलमार्गे पुलाची शिरोलीकडे वळवण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठं-मोठे खड्डे पडल्याने वाहतूक संत गतीने सुरू होती. तर काही ठिकाणी वाहनांचे लहान-लहान अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
गुरुवारी सायंकाळी चार वाजता उचगाव ते शिये कासारवाडी फाटापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत चालू करण्यास पोलिसांना मदत केली.
हेदेखील वाचा : Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
एमआयडीसी पहिला फाटा व मयूर फाटा येथील वाहतूक सुरळीत करण्यास गोपनीयचे निलेश कांबळे यांना नागावचे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर कांबळे, आकाश कांबळे, शंतनू गुर्जर, पेठवडगावचे कपिल कुलकर्णी, शियेचे अर्जुन मुरगुंडी यांनी मोलाची मदत केली. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
पुण्यातील चाकण येथेही मोठी कोंडी
दुसरीकडे, चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. फळ विक्रेते व शेतीमाल विकणाऱ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. कोंडीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस रांगेत अडकतात. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होऊन नुकसान होत आहे. गर्दीच्या वेळी वादविवाद, भांडणे, तसेच मोबाईल आणि वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.