उपराष्ट्रपती निवडणुकीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ (Photo Credit- X)
Vice President Election 2025: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक (Vice President Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
भाजपची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांनी एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी राधाकृष्णन यांचा संबंध महाराष्ट्राशी असल्याने, राज्यातील सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
एकीकडे भाजप बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने आपले उमेदवार उभे करून ही लढत रंजक बनवली आहे. विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रेड्डी यांनी संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवली.
Maharashtra: CM Devendra Fadnavis seeks support from NCP (SP) chief Sharad Pawar and Shiv Sena (UBT) president Uddhav Thackeray for NDA candidate C.P. Radhakrishnan in the upcoming Vice-Presidential elections.#Maharashtra #DevendraFadnavis #SharadPawar #UddhavThackeray pic.twitter.com/bzT8XEQL9u
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) August 21, 2025
शरद पवार यांनी ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ही लढाई संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आहे. उपराष्ट्रपती पदासाठी ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी, ज्यांना लोकशाही मूल्यांवर गाढ विश्वास आहे, तेच या पदाला न्याय देतील,” असे त्यांनी म्हटले आहे.
आज लोकसभा विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी, राज्यसभा विरोधी पक्षनेते श्री. मल्लिकार्जुन खर्गे व इंडिया आघाडीतील पक्षातील प्रमुख नेत्यांसह ‘उपराष्ट्रपती’पदाचे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल… pic.twitter.com/aKna5w48Wf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 21, 2025
त्याचप्रमाणे, खासदार संजय राऊत यांनीही रेड्डी यांच्या उमेदवारी अर्जावेळी काढलेले छायाचित्र ट्वीट केले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोन्ही गट ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारासोबत आहेत. आता उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत काय होतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.