Trimbakeshwar Temple Nashik
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरू असताना मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे अपघात किंवा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी मंदिर काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या पितृपक्षामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होत आहे. तसेच, शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी तसेच, भाविकांना दर्शन घेतला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद असले तरी श्री त्र्यंबकेश्वराची धार्मिक परंपरा मात्र खंडित होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मंदिरातील नित्यपूजा, त्रिकाल पूजा तसेच इतर पारंपरिक धार्मिक विधी हे नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नसले, तरी मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी नियमितपणे पार पडणार आहेत. तसेच, मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख आणि कालावधी याबाबत देवस्थान ट्रस्टकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे प्रस्तावित आहेत. रस्ते विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कामांना या काळात वेग देण्यात येणार आहे.मंदिर काही काळ भाविकांसाठी बंद असल्याने विकासकामे आणि आवश्यक नियोजन अधिक सुरक्षितपणे करता येणार असल्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची तयारी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.






