corona
नागपूर : हद्दपार झालेल्या कोरोनाचा राज्यात सध्या ‘जेएन1’ हा नवा व्हेरियंट दाखल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हेरियंटमुळे भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नव्हता. मात्र, मंगळवारी धरमपेठ झोनमधील 60 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. त्यापाठोपाठ बुधवारी (ता.27) आणखी दोघानां कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्यातरी आढळलेल्या रुग्णांना कोरोनाच्या कोणत्या उपप्रकाराने बाधा झाली हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. शहरात अद्याप जेएन. 1 ची बाधा झालेला कोरोनाबाधित नाही. यापूर्वी 9 जणांचे नमुने निरीत पोचले आहेत. नव्याने आढळलेल्या या तिघांचे नमुने प्रयोगशाळेतून नीरीकडे पाठवण्यात आली आहेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटची तीव्रता सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नंदनवन परिसरातील 35 वर्षाचा युवक तर धरमपेठ झोनमधील 81 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती आहे. धरमपेठ झोनमध्ये कोरोनाचे दोन तर नंदनवन येथील एक असे तीन सक्रिय बाधित झाले आहेत. यामुळे सतर्क राहण्याचे, मास्क व स्वच्छतेचे नियम आवाहन महानगरपालिकेसह आरोग्य विभागाने केले आहे.