मुंबई : रस्त्यावर दिसणाऱ्या मॅनहोलमुळे (Manhole in Mumbai) अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. म्हणूनच त्यावर झाकण लावण्याची व्यवस्था केली जाते. पण याच मॅनहोलच्या झाकणांची चोरी होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बोरीवलीत एमएचबी कॉलनी पोलिसांनी 15 झाकणांची चोरी करणाऱ्यास अटक केली आहे. कमलेश ऊर्फ बंटी सोलंकी (29) असे त्याचे नाव असून, तो अब्दुल नजीर शहा (51) यास चोरीच्या झाकणांची विक्री करायचा. त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोलंकी याला जेव्हा पोलिसांनी अटक करून अधिक चौकशी केली असता तेव्हा त्याने नशेसाठी झाकणांची चोरी करत असल्याचे सांगितले.
उच्च न्यायालयाचे कडक निर्देश
उच्च न्यायालयाने मॅनहोलवरून फटकारल्यानंतर मुंबई महापालिका जागी झाली आहे. महापालिकेने भुयारी गटारांच्या मॅनहोलच्या झाकणांची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
मध्यभागी असलेले झाकण चोरीला
आयसी कॉलनी येथील डांबरी रस्त्यावर मध्यभागी असलेले लोखंडी झाकण चोरीला गेले होते. पालिकेच्या आर विभागाकडून 20 जून रोजी प्राजक्ता दवंगे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार परिमंडळ 11 चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला.
332 मॅनहोल झाकणांची चोरी
मुंबईत जानेवारी ते मे दरम्यान एकूण 332 मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी झालीय. मुंबई महापालिकेच्या पाहणीत हे आढळून आलय. ही सर्व झाकणं ओतीव लोखंडापासून बनवलेली होती.
2020 मध्ये किती झाकणांची चोरी झालेली?
2020 मध्ये मुंबईत एकूण 458 मॅनहोल झाकणांची चोरी झाली होती. मागच्यावर्षी हाच आकडा वाढून 836 झाला. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात चोरी झालेल्या झाकणांची सरासरी पाहिली, तर 2021 पेक्षा हा आकडा जास्त असू शकतो.






