मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडून २० वर्षानंतर मनातील गुपीत राज ठाकरे यांनी उघड केलं. यावेळी त्यांना ३० जानेवारी २००३ला महाबळेश्वरच्या ‘त्या’ अधिवेशनात तुम्हीच पक्षप्रमुख पदाचा प्रस्ताव टाकला होता, आता त्याच्या पश्चात्ताप होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज म्हणाले, बिल्कुल नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे अपत्य आहे. त्या संपूर्ण काळामध्ये बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं. हे मला जाणवत होतं. मला माहिती होतं. राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पचत नाहीत किंवा पटत नाहीत. पण तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेनाप्रमुख व्हावं, अध्यक्ष व्हावं, असं कधीच नव्हतं. मी बाळासाहेबांना याबद्दल पत्र पण लिहिली होती. मी त्याही काळात फक्त एकच गोष्ट विचारत होतो की, ‘माझा जॉब काय?’ म्हणून मी काकांना म्हटलं. उद्धवच्या पक्षप्रमुख पदाचा प्रस्ताव मीच मांडतो. असे मत त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले, म्हणजे तुम्ही इतरांवरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त निवडणुकीला भाषणासाठी बाहेर काढणार. मी ज्यावेळेला भाषण देतो, त्यावेळेला मी एखाद्या गोष्टीला कन्व्हिन्स असतो. कन्व्हेक्शनने मी ते बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर समजा ती गोष्ट झाली नाही, तर मी पुढच्यावेळेला काय म्हणून जाऊन भाषण करायचं? म्हणजे मी दुसऱ्यांच्या जीवावरती माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. उरला विषय समजा अध्यक्षपदाचा तर तो निर्णय बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांच्या मनात काय होतं हे मी बाळासाहेबांना महाबळेश्वरला सांगितलं.