नागपूर – मोगलांच्या सैनिकांनी धसका घेल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी धनाजी दिसायचे तसे, उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे – फडणवीस दिसतात, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना हाणला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संताजी धनाजींसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र दिसतात. त्यामुळे सतत त्यांच्याबद्दल बोलतात. त्यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल विजयी होतील, व आपला पराभव होईल, अशी भीती उद्धव सेनेला वाटते. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेऊन अर्ज रद्द करण्याचे षडयंत्र चालू आहे. पण ते षडयंत्र यशस्वी होणार नाही.
[read_also content=”भाजपाने अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/raj-thackeray-letter-written-to-devendra-fadnavis-about-andheri-election-336689.html”]
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार बनविताना आणि नंतर अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला त्यांनी साथ दिली आहे. उद्धव सेनेला मत देणे म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत असेल. परिणामी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार उद्धव सेनेला मत देणार नाही कारण उद्धवजी प्रत्यक्षात काँग्रेस – राष्ट्रवादीसाठी मते मागत असल्याचे त्यांना माहिती आहे. राज्यात आज ११६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान होत आहे. त्यांचा निकाल सोमवारी लागणार आहे. निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकावर असेल आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळेल. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत ६०८ पैकी २९४ ग्रामपंचायती जिंकून भाजपाने पहिला क्रमांक मिळविला होता.