इस्लामपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत १४ वर्षाखालील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा इस्लामपुरात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर यांनी दिली.
ते म्हणाले,” इस्लामपुरातील पोलीस कवायत मैदानावर या स्पर्धा होतील. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली, प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर, निशिकांत दादा युथ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्पर्धा होत आहेत.
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, लातूर, संभाजीनगर या विभागाचे संघ स्पर्धेमध्ये आपले कौशल्य पणाला लावतील. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडू, पंच,पदाधिकारी इस्लामपूर शहरात दाखल झालेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.”
निशिकांत दादा युथ फाऊंडेशनचे अजित पाटील म्हणाले,” प्रकाश पब्लिक स्कूलच्या माध्यमातून राज्यस्तरीय शालेय स्पर्धा घेण्याची संधी मिळाली आहे. सर्व ३५० खेळाडू, २० पंच, व अन्य पदाधिकारी यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी, पदाधिकारी,खेळाडूंना सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. एक हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केली आहे. निशिकांत दादा युथ फाऊंडेशनचे सर्व खेळाडू,कार्यकर्ते या स्पर्धेच्या नियोजनात आहेत.जिल्ह्यातील हॉकी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.”
भाजपा शहर अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अशोक खोत, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, हॉकी प्रशिक्षक आरती हलींगळी,व्हॉलीबॉल प्रशिक्षक जमीर अत्तार, प्रशिक्षक सीमा पाटील,निशिकांत दादा फाउंडेशनचे प्रशिक्षक अशोक जाधव, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राहुल पवार,मुस्ताक खाटीक, सुष्मिता यादव,निशिकांत दादा युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत आठ विभागांचे मुले व मुलींचे १६ संघ सहभागी होतील. या स्पर्धा व निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाईल. या संघांचे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीच्या तयारीचे शिबीर अमरावती येथे होईल. त्यानंतर हाच संघ महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गाजियाबाद – मध्यप्रदेश येथे २८ डिसेंबरला राष्ट्रीय स्पर्धेत खेळेल.