पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का? 'त्या' प्रकरणावरुन मुरलीधर मोहोळ संतापले
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील मुलांकडून निरपराध मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. तसेच, पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का अशा भाषेत त्यांनी पुणे पोलिसांना सुनावले.
कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरात मिरवणूकीदरम्यान एका निरपराध आयटी इंजिनिअर देवेंद्र जोग या तरुणाला गुंड गजा मारणे याच्या टोळीतील चौघांनी बेदम मारहाण केली. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. ही बाबसमोर आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी तरुण देवेंद्र याची चौकशी केली. तसेच, पोलिसांना कारवाईची सूचना केली होती. नंतर याप्रकरणात पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतली. तोपर्यंत किरकोळ कलम लावून गुन्हा नोंदविण्यात आला होता.
मुरलीधर मोहोळ हे गुजरात व दिल्ली दौऱ्यावरून पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, देवेंद्र हा माझ्या कार्यालयात काम करत नाही. तो भाजपचा कार्यकर्ता असून, सर्वसामान्य पुणेकर आहे. त्याच्यासोबत घडलेली घटना ही कोणत्याही पुणेकरांसोबत घडली असती तरीही माझी भूमिका ही कडक कारवाईचीच राहिली असती. किरकोळ कारणावरून त्याला बेदम मारले जाते. हे चूकीचे आहे.
दरम्यान, त्यांना गुन्हेगारांचे सोशल मिडीयावर व्हायरल होणारे रिल्सबाबत विचारले असता त्यांनी पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. पुण्याची संस्कृती वेगळी असून, पुण्याचे नाव खराब झाले नाही पाहिजे. नवीन पिढीने काय घ्यायचे. हे थांबले पाहिजे. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, असेही मोहोळ म्हणाले. कोणत्याही पुणेकरासोबत असे घडले नाही पाहिजे.
पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का ?
गुन्हेगारांचे रिल्स व्हायरल होत असतील तर पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का ? असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, जो चुकतोय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांवर झालेल्या मारहाणीबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले की, असे होत असेल, पोलिसांवरच हात उचलले जात असतील तर हे गंभीर असून, आयुक्तांनी याची गंभीर दखल घेयला हवी. जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव हे आदाराने घेतले जाते. सुसंस्कृत, विद्याचे माहेर घर व औद्योगिक शहर आहे. त्यामुळे या शहराचे नाव खराब होत असेल असे कुठलेही प्रकरण खपवून घेतले जाणार नाही.