
Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड
Social Media Rumors Alert: उरण तालुक्यामध्ये सध्या मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर आणि तोंडी चर्चामधून वेगाने पसरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उरण पोलिस ठाण्याच्या वतीने तत्काळ तपास करण्यात आला असता अशा कोणत्याही अपहरणाच्या घटना घडल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून उरण शहरासह ग्रामीण भागात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी नागाव परिसरात एका मुलीला दोन दुचाकीस्वारांनी पळवून नेल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली, मात्र पोलिसांनी संबंधित मुलीची व तिच्या कुटुंबियांची चौकशी केली असता, ती मुलगी आपल्या मित्रांसोबत स्वतःहून दुचाकीवरून गेली होती, हे निष्पन्न झाले. त्यामुळे या घटनेचा अपहरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा: वॉर्ड २९ मध्ये ठाकूर-शेख लढत; प्रचार शिगेला, उमेदवारी रद्दीकरणाचा वाद चिघळला
केगाव येथील विनायक रोड परिसरात एका १३ वर्षीय मुलीच्या डोळ्यांत पावडर टाकून तिला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचीही पोलिस यंत्रणेने गांभीर्याने दखल घेत तपास केला. तपासाअंती असे आढळले की, दुचाकीवरून जाणाऱ्या युवकांपैकी एकाने तोंडातील गुटखा रस्त्यावर धुंकत असताना त्यातील पावडर उडून ती मुलीच्या डोळ्यांत गेली. यामुळे गैरसमज झाला. प्रत्यक्षात अपहरणाचा कोणताही प्रयत्न झाला नव्हता, या दोन्ही घटनांच्या सखोल तपासानंतर उरण पोलिसांनी ‘मुले पळवणारी
टोळी सक्रिय’ असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
अफवांमुळे अनावश्यक भीती पसरते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किया हालचाली आढळल्यास नागरिकांनी स्वतः निर्णय घेण्याऐवजी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर खात्रीशिवाय माहिती शेअर करू नये, तसेच सत्यता तपासल्याशिवाय कोणतीही पोस्ट पुढे पाठवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.