
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण रंगले आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी सक्रीय राजकारणामध्ये सहभाग घेतला आहे. अनेकांवर ते राजकीय टीका करत असतात. तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीलावर निशाणा साधला आहे. वंचित बहुजन आघाडीला तुषार गांधी छुपा रुस्तम म्हणाले. यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत वंचितने तुषार गांधी यांना सुनावले आहे. तसेच महात्मा गांधी यांचा देखील उल्लेख वंचित बहुजन आघाडीने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
काय म्हणाले होते तुषार गांधी?
आज तुषार गांधी यांनी एका या वृत्तवाहिनीशी बोलताना वंचित बहुजन आघाडीवर जोरदार टीका केली होती. “पूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वंचित बहुजन आघाडीने ‘छुपा रुस्तम’ म्हणून काम केलं आहे. मतांचं गणित बिघडवण्यासाठीच त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने त्यांना पर्याय दिला होता. ते इंडिया आघाडीत येऊ शकले असते. त्यांनी व्यावहारिक मागणी केली असती, तर इंडिया आघाडीनेही त्यांना घेतलं असतं. पण ते ठरवूनच आले होते. त्यांना जबाबदारी दिली होती. आणि त्यांनी त्यांचे काम पूर्ण केलं”, अशा शब्दांत तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीवर घणाघात केला.
वंचित बहुजन आघाडीचे ट्वीट
We heard Tushar Gandhi’s analysis of VBA. We have nothing to say except for the fact that he reeks of his great-grandfather’s casteist sentiments. MK Gandhi did NOT want a separate electorate for the Depressed Classes (now termed as the Scheduled Castes) and now his… — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) May 18, 2024
वंचित बहुजन आघाडीचे प्रत्युत्तर
तुषार गांधींच्या या टीकेवर वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ऑफिशियल अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यांनी उत्तर दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने लिहिले आहे की, “तुषार गांधींनी वंचित बहुजन आघाडीचं केलेलं विश्लेषण आम्ही ऐकलंय. त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांच्या पणजोबांसारख्याच त्यांच्याही जातीय भावना आहेत. महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नाहीये. महात्मा गांधींना याचा नक्कीच अभिमान वाटत असेल की, त्यांचा पणतू त्यांच्या सडलेल्या जातीयवादी विचारसरणीचा आणि अनुसूचित जातींबद्दलच्या वृत्तीचा वारसा पुढे नेत आहे,” असे ते म्हणाले.