Vantara Offical statement on Madhuri Elephant
Vantara Offical statement on Madhuri Elephant : गुजरात : वनतारा पशुसंवर्धन केंद्रामध्ये कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी हत्तीण नेण्यात आली आहे. नांदणी गावातील जैन मठातील ही हत्तीण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गुजरातला पाठवण्यात आली आहे. यावरुन कोल्हापूरमध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. अंबानीविरोधात आवाज उठवला जात असून जिओचे सिमकार्ड देखील बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पदयात्रा देखील काढण्यात आली असून सोशल मीडियावर देखील अंबानींविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, जोरदार वाद निर्माण झाल्यावर वनताराकडून यावर अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
वनतारा हे अनंत अंबानी यांच्या मालकीचे असल्यामुळे रिलायन्स विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे वनतारा पशू संवर्धन केंद्राकडून ऑफिशियल पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये वनताराची अधिकृत भूमिका देखील समोर आली आहे. वनताराकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये लिहिले आहे की, “कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणी सोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती.”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे. माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली.”
“जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरी च्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुख्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.” अशा शब्दांत वनतारा पशू संवर्धन केंद्राकडून अधिकृत पत्रक जारी करत भूमिका मांडण्यात आली आहे.