पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे नेते वसंत अमराळे इच्छूक होते. मात्र शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे अमराळे नाराज आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहितीही अमराळे यांनी दिली आहे. त्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
2014 च्या विधानसभा निवडणूकीत अमराळे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. तेंव्हा अमराळे यांची भाजप नेत्यांनी मनधरणी केली, तेंव्हाही तिकीट नाकारले होते. तसेचं 2019 मध्येही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना त्यावेळीही उमेदवारी मिळाली नाही. 2019 मध्येही भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढली होती. दरम्यान यंदाच्या विधानसभेसाठी भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली. यादीत नाव येईल असं वसंत अमराळे यांना वाटत होते. मात्र पुन्हा एकदा त्यांना डावलून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अमराळे हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत.
जनतेचा माझ्यावर प्रचंड विश्वास – वसंत अमराळे
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मी अनेक मोठी कामे केलेली आहेत. या मतदारसंघातील अनेक नागरिकांना मी देवदर्शन घडविले आहे. म्हणून मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. मी भाजपमध्ये अनेक आंदोलने केली. जनतेसाठी शिबीरे घेतली. मतदारसंघातील जतनेचा माझ्यावर विश्वास आहे. भाजपकडून वारंवार एकाच व्यक्तीला उमेदवारी दिली जात आहे, शिवाजीनगर मतदारसंघात घराणेशाही चालत असून, शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारसंघातील नागरिकही नाराज आहेत. मी माझा निर्णय लवकरच जाहीर करणार आहे, असं वसंत अमराळे म्हणाले.
सोमवारी उमेदवादवारी अर्ज दाखल करणार
अमराळे नवराष्ट्रशी बोलताना म्हणाले की, शिवजीनगर मतदारसंघात 2024 ची निवडणूक ही वेगळी होणार आहे. या भागात माझं भरीव काम आहे, म्हणून मला उमेदवारी मिळावी, अशी जनतेची इच्छा होती. मला भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी वारंवार डावललं जात आहे. त्याच -त्याच व्यक्तीला पुन्हा उमेदवारी देणे हे जनतेला मान्य नाही. म्हणून मी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील विकास करण्यासाठी जनता मला निवडून देईल असा विश्वास आहे.