राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण (फोटो सौजन्य: X.com)
भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील दाहकतेचा निषेध करत आणि त्या काळात भारतीय जनतेने सहन केलेल्या यातना, विस्थापन व बलिदानांच्या स्मृती जपण्यासाठी आज राज्यभरातील सुमारे एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना ठामपणे दूर सारून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा ध्यास घ्यावा.”
दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२१ साली घेतला. या दिवसाचे उद्दिष्ट असे की, फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या वेदना व संघर्ष विसरला जाऊ नये, तसेच भावी पिढीत सामाजिक सलोख्याची आणि एकतेची भावना दृढ व्हावी. १९४७ च्या फाळणीत लाखो लोकांना घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावे लागले. यात हजारो लोकांनी आपला जीव गमावला आणि असंख्य कुटुंबे तुटली. या ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना देशाच्या अखंडतेचे महत्व पटवून देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक ज्ञानच नव्हे तर रोजगाराभिमुख कौशल्ये दिली जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थांमध्ये विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर, मंत्री लोढा यांनी प्रत्येक आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वाढवणारा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. या श्रेणीत ऑगस्ट महिन्यासाठी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निवडण्यात आला.
या निमित्ताने राज्यातील शासकीय व खाजगी मिळून एक हजार आयटीआय संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले गेले. फाळणीविषयक चित्रप्रदर्शन, ऐतिहासिक छायाचित्रांची प्रदर्शने, व्याख्याने, तसेच नाट्यप्रयोग यांद्वारे विद्यार्थ्यांना त्या काळातील घटनांची माहिती देण्यात आली.
या स्मरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि देशाच्या एकात्मतेबाबत नवी प्रेरणा त्यांना मिळाल्याचे दिसले.