नागपूर – लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची पहिली यादी प्रसिद्ध झाली. मात्र यामध्ये महाराष्ट्राती एकाही नेत्याचे नाव नव्हते. १६ राज्यातील १९५ मतदारसंघातील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील कोणाचेच नाव नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरुन कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर टीका केली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोन-दोन की तीन-तीन जागा द्यायच्या हे निश्चित झालेले नाही, त्यामुळे महाराष्ट्राची यादी तयार झालेली नाही. असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे. हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणार आरक्षण दिल आहे, अशी मराठा समाजाची समज झाली आहे. मराठा समाजाचा सर्व रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. मतदानांवर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेण्याचा उद्योग सरकारने यापूर्वीही केला आहे. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, निवडणुकीला उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आड येतोय, त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत त्याप्रमाणे मतदान करावे. मनातील राग काढण्यासाठी उमेदवार उभे करणे योग्य राहणार नाही”, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका युवकाला जबर मारहाण केली. त्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. गुंडाना संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करत नाही. खून करणारे, बेताल वक्तव्य करणारे, महिलांबद्दल वक्तव्य करणारे आणि जाहीर ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही. हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशांच्या मस्तीचा परिणाम आहे. त्यामुळे कारवाईची अपेक्षा करणे कितीही अन्याय झाला तर न्याय मिळेल हे गैरसमज आहे, असं मला वाटतं. अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.