मुंबई : राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू असून, राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.
विनोद तावडे यांच्या रणनितीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने त्यांची नाराजीदेखील दूर करण्याचा प्रयत्न असू शकतो.
अजित पवार गटाकडून पार्थ की तटकरे?
राज्यसभेसाठी अजित गटाकडून एका उमेदवाराला तिकीट देण्यात येणार आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पार्थ मागील लोकसभेत निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे राज्यसभेतून मुलाची राजकारणात एंट्री करण्याची रणनीती आहे. तर तटकरे सुध्दा उमेदवारीसाठी इच्छुक आहे.
काँग्रेसकडून कन्हैया की निरुपम?
संसदेत सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसकडून योग्य व्यक्तीला तिकीट मिळावे असे पक्षश्रेष्ठींचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून काँग्रेस नेते संजय निरुपम हे सर्वाधिक पसंतीचे असल्याची माहिती आहे. पश्चित मुंबईच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाकडून दावा केला आहे. तर काँग्रेसकडून निरुपम यांनी यावर दावा केला. त्यामुळे वितुष्ट टाळण्यासाठी निरुपम यांची राज्यसभेत वर्णी लागू शकते तर बिहारमधील नेते कन्हैया कुमार हे सुध्दा राज्यसभेसाठी स्पर्धेत आहेत. कुमार यांना इमरान प्रतापगडी यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातून काँग्रेस राज्यसभेवर पाठवू शकते. मात्र, यामुळे राज्यातील नेत्यांमध्ये नाराजी राहू शकते.