फोटो सौजन्य AI
Wai : एम.आय.डी.सी. परिसरातील अर्थव फाउंड्री कंपनीच्या कथित प्रदूषणामुळे शेती, पिके आणि विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. सन २००८ पासून तब्बल १८ वर्षे हा त्रास सहन करूनही कंपनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आता तीव्र झाला आहे.
शंकर एकनाथ शेलार आणि सौ. तेजस्विनी शैलेश राजपूरे यांनी प्रांताधिकारी, वाई विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनात कंपनीच्या कारभाराविरोधात गंभीर तक्रारी मांडल्या आहेत. कंपनीच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे शेतातील पिकांवर राखेचा थर बसतो आणि पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच कंपनीतून बाहेर पडणारे रासायनिकदृष्ट्या दूषित सांडपाणी शेतातील विहिरींमध्ये मिसळत असल्याने पाण्याचे प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पावसाळ्यात कंपनीतील सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे पाणी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडले जाते. परिणामी शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या मार्गावर मोठे अडथळे निर्माण होत असून शेतीची कामेही प्रभावित होत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या समस्यांबाबत कंपनीच्या मालकांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
प्रशासनाकडे यापूर्वीही तक्रारी करूनही अद्याप कंपनीविरोधात ठोस कारवाई झालेली नसल्याने “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे गेल्या २००८ ते २०२६ या कालावधीत सातत्याने शेतीचे नुकसान होत असूनही संबंधित कंपनी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ निवेदने आणि तक्रारी करून प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.“आगामी चार दिवसांत अर्थ फाउंड्री कंपनीविरोधात योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही,तर
Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाई तहसीलदार कार्यालयासमोर सर्व संबंधित शेतकरी आमरण उपोषणास बसतील,” असा स्पष्ट आणि कडक इशारा निवेदनातून देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी, पाणी व मातीचे नमुने तपासणी, सांडपाणी व्यवस्थेची चौकशी तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानभरपाई देण्यात येणार का? याकडे आता वाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता तरी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

