
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) राजकीय धक्कातंत्राचा वापर करत, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार (NCP Chief Resign) होण्याची घोषणा केली. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी मिनतवाऱ्या केल्या, अश्रू ढाळले, तरी पवार मात्र निर्णयापासून ढळलेले दिसले नाहीत. नेत्यांना आग्रहाखातर बैठकही झाली, या बैठकीत निर्णयाच्या फेरविचाराचं आश्वासन पवारांच्या वतीनं देण्यात आलंय. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार हे या निर्णयावर दृढ असल्याचं मानण्यात येतं आहे. राष्ट्रवादीसमोर येत्या काळात पवार अध्यक्षपदी नसतील तर अनेक अडचणी येतील, असे प्रश्न विचारण्यात येत होते. त्यावर त्या-त्या वेळी उत्तरं शोधता येतील, असा सूर दोघांनीही कालच्या कार्यक्रमानंतर लावल्याचं सांगण्यात येतंय. जर पवार पक्षाध्यक्षपदी नसतील तर त्यांच्याऐवजी ही जागा कोणता नेता घेऊ शकेल, याची चर्चाही आता सुरु झालेली आहे. 2024 च्या निवडणुकांपूर्वी पवारांना पक्षासाठी राजकीय वारसदार घोषित करायचा आहे का, त्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय का, असा सवालही विचारण्यात येतोय.
कोण असेल राजकीय वारसदार?
राष्ट्रवादी काँग्रेस यापुढं कोणत्या नेत्याच्या अधिपत्याखाली वाढेल, याचा निर्णय 2024 पूर्वी करण्याचा पवारांचा मानस दिसतो आहे. निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशानं या नेतृत्वावर शिक्कामोर्तबही होणार आहे. तसंच शरद पवारांच्या हयातीत नवं राजकीय नेतृत्व उभं राहणार असल्यानं, त्या नेत्यावर होणारे स्वपक्षीयांचे आघात रोखण्याचं काम पवार लिलया करु शकणार आहेत. शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांच्या हयातीतच उद्धव ठाकरे हे पुढचे पक्षप्रमुख असतील, असा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत दिला होता. पक्षात झालेली फूट लक्षात घेऊनही त्यांनी उद्धव ठाकरेंकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका, विधानसभा निवडणुकांत त्यांचं नेतृत्व सिद्ध करुन दाखवलं. तसचं काहीसं राष्ट्रवादीत होण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं सांगण्यात येतंय.
अजित पवार, सुप्रिया सुळे की आणखी कोणी?
आता पवारांचा राजकीय वारसदार कोण, यासाठी निरनिराळी नावं चर्चेत आहेत. त्यात प्रामुख्यानं सुप्रिया सुळे, अजित पवार या दोन नेत्यांनी नावं चर्चेत येतायेत. यासह जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचीही चर्चा आहे. आता पवार त्यांचा राजकीय वारसदार पवारांतून नेमणार की इतर नेत्यांना संधी देणार, हा ही निर्णय महत्त्वाचा मानण्यात येतो आहे. पुढचा अध्यक्ष ठरवण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना स्थानही देण्यात आलंय. मात्र पुढच्या अध्यक्षाचा निर्णय हा शरद पवारच करतील असं सांगण्यात येतंय. हा निर्णय करताना पक्षातील कुणी नाराज होणार नाही, पक्षात फूट पडणार नाही, याची काळजीही पवारांनाच घ्यावी लागणार आहे.
केंद्रात सुप्रिया सुळे, राज्यात अजित पवार?
राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. सुळे या गेले काही काळ देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. बारामतीच्या खासदारही आहेत. अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे पवारांमुळे चांगले संबंधही आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे या देशाच्या पातळीवर पवारांच्या वारसदार ठरण्याची शक्यता आहे. पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचाही दिल्लीच्या राजकारणातील वावर आणि संबंध चांगले आहे. सुप्रिया सुळे यांना दिल्लीच्या राजकारणात चांगले स्थान मिळवून देण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. आगामी काळात राष्ट्रवादी भाजपासोबत गेली तर सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रीपदही मिळण्याचीही शक्यता आहे.
राज्यात अजित पवार मुख्यमंत्रिपदी?
तर राज्यात राष्ट्रवादीचा आगामी काळातला चेहरा अजित पवार असण्याची शक्यता आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवारांचे या पदासाठी स्पर्धक मानले जातात. मात्र अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत असलेली प्रतिमा, त्यांना असलेली महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण, बेधडक नेतृत्व या त्यांच्या गुणांमुळे अजित पवार हे राज्यात राष्ट्रवादीचा चेहरा ठरण्याची शक्यता अधिक आहे. भाजपासोबत गेल्यास राष्ट्रवादीला पर्यायाने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. असे झाल्यास राष्ट्रवादी येत्या काही वर्षांत राज्यात अधिक घट्ट पालंमुळं रुजवू शकेल. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करता येणं, सरकारमध्ये आल्यानंतर पवारांना आणि राष्ट्रवादीला सहज शक्य होणार आहे.