कणकवली : कणकवलीमध्ये (Kankavali) सध्या बॅनरबाजी सुरु आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्याचबरोबर बॅनर लावून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. कणकवली शहरातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर ‘‘वक्त आने दो…! जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’’…! असे लिहिले आहे. या बॅनरवर उदय सामंत (Uday Samant) आणि किरण सामंत (Kiran Samant) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, हा इशारा नेमका कुणाला दिला ? याबद्दल चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) निकालानंतर नवनिर्वाचित खासदार नारायण राणे (MP Nayaran Rane) यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी काही आरोप केले होते. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरणही दिले होते. त्यापाठोपाठ माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनीही काही जणांचा हिशोब चुकता करायचा आहे असा इशारा देखील कणकवलीतील पत्रकार परिषदेत दिला होता. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चर्चेचा विषय ठरली आहे.
यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना पक्षाकडून नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा शिवसेना नेते किरण सामंत आणि जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लावलेला बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला होता. त्यामुळे याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू होती. त्यानंतर आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालया बाहेर हा लावलेला बॅनर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
“वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे” या आशयाचा इशारा नेमका कुणाला यावर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बॅनर वरून आता सिंधुदुर्गातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.