
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदारांना पैसे वाटप; वैभव नाईकांनी व्हिडिओ जारी करत साधला निशाणा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. असे असताना मालवण नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ पुरावा म्हणून शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, शिंदे मालवणात आले, बॅगेतून काय आणले? या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करत असा दावा केला आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन धावत आहेत. वैभव नाईक यांनी हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमुळे आणि आरोपांमुळे मालवणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे व्हिडिओत?
परवा एकनाथ शिंदे मालवणात आले. तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरापासून लपण्यासाठी धावत आहेत. हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधील मतदारांना वाटले आहेत, असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
हेदेखील वाचा : Uday Samant : “कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता”, उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका
शिंदे गटाच्या धोरणावर टीका
राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे-शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असे नाईक म्हणाले.
अफाट पैसा वाटला जातोय
ही निवडणूक आहे की पैशांची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय. आज जे चालू आहे, त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का? सगळे कायदे धाब्यावर. शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात? शिंदेंनी मालवणला दोन बॅगमधून काय आणले? पैसे होते? भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटत आहेत, असे रिपोर्ट येत आहेत.