इंदापूर: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण उद्या पर्यंत मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे केवळ साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ दोन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा राहिला आहे.त्यामुळे उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच चिंता वाढणार आहे.
सध्या उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये सहा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते.
धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६५ पूर्णांक ५७ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.
यंदा धरण ११० टक्के भरलेले असताना देखील ते एप्रिल महिन्याच्या मध्यातच मायनस मध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच शिल्लक पाणी मे, जून महिन्यांपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान संबंधित विभागापुढे आहे.
पुण्यात पाण्याची मागणी वाढली
वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, वॉलमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेत येत आहेत. तक्रार देवूनही तसेच पाठपुरावा करुन देखिल पाणी येत नसल्याने थेट पाणीपुरवठा विभागात येवून प्रमुखांना घेराव घातला जात आहे.
एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ आदी पेठांचा भाग, तसेच उपनगर भागासह सामाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.