पुण्यात पाण्याची मागणी वाढली (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, वॉलमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेत येत आहेत. तक्रार देवूनही तसेच पाठपुरावा करुन देखिल पाणी येत नसल्याने थेट पाणीपुरवठा विभागात येवून प्रमुखांना घेराव घातला जात आहे.
एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ आदी पेठांचा भाग, तसेच उपनगर भागासह सामाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.
शिवाजी नगर, बिबवेवाडी, वडगाव शेरी, खराडी आदी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर एरंडवणे, पटवर्धन बाग, नळ स्टॉल आदी भागात पूर्ण दाबाने पाणी पाणी पुरवठा होत आहे, तसेच वेळेआधीच अर्धा ते पाऊण तास पाणी जात आहे. सोसायट्यांच्या टाक्या भरत नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून आम्ही पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करत आहोत असे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात नागरिकांना कमी पाणी मिळत आहे. याप्रमाणे सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, जनवाडी, मॉलेड कॉलनी या परिसरातील आहे. पाण्याचा दाब नसल्याने बारीक धारेने पाणी येत आहे. पूर्ण वेळ पाणी असले तरीही टाक्या भरत नाहीत. धायरी, धायरी फाटा परिसरातही कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येथील सोसायट्यांना टँकर मागवावे लागत असल्याने दररोज हजारो रुपये टँकरवर खर्च करावे लागत आहेत.
एकीकडे पाणी टंचाई निर्माण होत असताना दुसरीकेडे उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे. त्यानंतर टाकी भरण्यास वेळ लागत आहे. पण पाणी दुसऱ्या भागाला पाणी सोडणे आवश्यक असल्याने टाकीत पूर्ण दाबाची पातळी येण्याआधीच पाणी पुरवठा सुरु करावा लागत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या सुरुवातीच्या भागात जास्त पाणी उपलब्ध होत आहे. जलवाहिनीचा शेवटचा भाग, उंचावरील भागात पाणी पोचण्यास उशीर होत आहे आणि त्या भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असेल तर जून महिन्यापर्यंत आणखी भीषण स्थितीला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाला योग्य नियोजन करून पाणी पुरवठा सुरु ठेवावा लागणार आहे.
Pune News: शहरातील ५२ टाक्यांची स्वच्छता; मात्र GBS क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक टाक्या…
जलवाहिन्यांचे नकाशे नाहीत उपलब्ध
शहराच्या कानाकोफऱ्यात पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. अनेक जलवाहिन्यांद्वारे पाणी येण्यास अडथळा येत आहे. तसेच जलवाहिन्याअसून देखिल पाणी येत नाही. जलवाहिन्यांचे कनेक्शन तसेच वॉल दुरुस्ती केली जाते. परंतु शहरातील जलवाहिन्यांचे नकाशेच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असते. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास कसरत करावी लागते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, कमी वेळ पाणी येणे अशा अडचणी येत आहेत. नेहमीपेक्षा २ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. त्याप्रमाणे वाढीव पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी दिले जाईल. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा धरणसाठ्यात पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे.
– नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका.