नांदेड : ‘मराठा आरक्षणाबाबत गैरसमज पसरवण्यात आले. मी अनेक गावांमध्ये जाऊन याबाबतचे वास्तव सांगितले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे, जे आजही लागू आहे. या दहा टक्के आरक्षणाचा अनेकांना फायदाही झाला. ज्यांच्याकडे जुने दाखले मिळाले त्यांना कुणबी प्रमाणपत्रेही देण्यात आली. सोबतच सगेसोयऱ्यांच्या विषयाबाबत प्रक्रिया सुरू आहे. पण हा विषय जितका लोकांपर्यंत पोहचालया हवा होता, तो पोहचवण्यात आम्ही कमी पडलो,” अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींवरही चर्चा केली. विधानसभा निवड़णुकीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘भोकर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहेत. पुढची रणनीती ठरवली जात आहे. पण उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही.’
काँग्रेसबाबत त्यांना विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल मला काही बोलायचं नाही, जे निकाल लागले ते सर्वांच्या समोर आहेत. काँग्रेसला मताधिक्य मिळालं हे मान्य करावे लागेल. पण एकंदरीत मताची आकडेवारी पाहिली तर भाजपलाही चांगले मतदान झाले आहे. दोघांमध्ये फक्त काही टक्क्यांचा फरक आहे. भाजपाचे एकूण मिळालेले मतदान काँग्रेसच्या बरोबरीत आहे.
शक्तिपीठ महामार्गावरही त्यांनी भाष्य केले. ‘शक्तिपीठ महामार्गाचे काम थांबवले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्गाची कामे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये थांबवण्यात आली आहेत. नांदेडमध्येही काम थांबले पाहिजे. विनाकारण लोकांच्या शेती संपादनाची कारवाई होऊ नये. नांदेडच्या लोकांचाही त्याला विरोध आहे. लोकांचा विरोध असताना काम करणे चुकीचे आहे. तसेच, मी याबाबतीत शासनाशी बोलणार आहे. काम त्वरित थांबले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्याला मंत्रिपद मिळावे हे तुम्हाला अपेक्षित होते का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, ‘ते फक्त देशाच्या पंतप्रधानांना माहीत असू शकते, कॅबिनेट संदर्भातील निर्णय पंतप्रधान स्वतः घेतात त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरवरही त्यांनी भाष्य केले. ‘ निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क, कारणमिमांसा, टीका टिपणी हे काही दिवस चालणार आहे. जे काही येतं ते समजून घेतलं पाहिजे. संघ अनेक वेळेस टीका करू शकतो, पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते. आपण लोकशाहीला मानणारे आहोत. यातलं सत्य काय आहे ते शोधून काढलं पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.