संग्रहित फोटो
भंडारा : हवामान खात्याने जिल्ह्यात 10 ते 12 फेब्रुवारी या तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी हलका व मध्य पाऊस तर एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीला जिल्ह्यातील सिहोरा परिसरात हलका पाऊस पडला. अन्य काही ठिकाणीही पाऊस झाला.
येत्या दोन दिवसांत आणखी पाऊस झाल्यास उन्हाळी व रब्बी पिकांना याचा फटका बसू शकतो. जिल्ह्यात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोरी, वांगी, टोमॅटो व पालेभाज्याचे पीक घेतले जात आहे. हलका पाऊस हा रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
हवामानात पुन्हा बदल
गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल सुरू आहे. सायंकाळी थंड वारे वाहू लागले आहेत. थंडीचा प्रभाव वाढला आहे. रात्री आणि पहाटे खूप थंडी जाणवत आहे. 10 फेब्रुवारीला सकाळपासूनच खराब वातावरण दिसून आले. सकाळी 11 वाजेपासून हवामानाने गारवा होता तो दिवसभर कायम होता. पावसाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या स्थितीत शेतात उगवलेल्या पिकांवर किडी रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
शेतकऱ्यांना नुकसानाची भीती
ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस पडल्याने पिकाचे मोठे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. याउलट खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीचा पंचनामा करूनही आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.