संग्रहित फोटो
कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असून, आता येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षानी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. येणाऱ्या निवडणुकीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.
दिवाळीनंतर पहिली निवडणूक ही जिल्हा परिषदेची होईल असे सांगताना ती नोव्हेंबरच्या शेवटी तर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांची निवडणूक लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याचबरोबर प्रतिक्षा असणाऱ्या महापालिका निवडणूक या जानेवारी महिन्याच्या शेवटीला होईल असा दावा त्यांनी केला आहे. तसेच पाटील यांनी, निवडणूकांचा कार्यक्रम सांगताना, आचारसंहिताही कधी लागेल हेदेखील स्पष्ट केले आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, असा दावा यावेळी पाटील यांना केला. त्यासोबतच राजकीय नेत्यांना विकासकामांचे उद्घाटन आटपून घ्या, असे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. २०१७ ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शोधावं लागलं नसते, पण ते अडून बसले त्यामुळे राज्यात चित्र वेगळं दिसले. नियती ही नियती असते, २०१९ साली सरकार जाणं हा नियतीचा खेळ आहे. उद्धव ठाकरे यांनी हे सगळं करून काय मिळवले? उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको. निवडणुका होऊन जातील पण पार्टीसाठी काम करत राहील पाहिजे. मी कधीच कोणते तिकीट मागितले नाही, नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असल्याचेही ते म्हणाले.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चिमटे देखील काढले. निवडणूकांचा कार्यक्रम आपण सांगितला म्हणजे आता काहीजण म्हणतील माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे. पण तसे काही नसून आपण गेली 40 वर्षे राजकारणात आहोत. त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.