पुणे : जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. मात्र सरकारने अद्याप त्यांना दुष्काळग्रस्तांसाठीची मदत, सुविधा दिल्या नाहीत. याकडे सरकारचे लक्ष वेधत ‘दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार’, असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला आहे.
‘सध्याच्या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे, अशी खंत धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. सरकारने ४० तालुक्यांत आणि सुमारे १ हजार २०० महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, कुठलीही उपाययोजना या भागात अद्याप केली नाही. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतही दिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धंगेकर म्हणाले, ‘यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. देशाची भूक भागविणारा, काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारी जनता प्रचंड अस्वस्थ आणि सरकारवर कमालीची नाराज असल्याचे पहायला मिळत आहे.’
‘शेतकऱ्यांवर सातत्याने एकामागून एक संकटे कोसळत आहेत. कधी पावसात खंड तर कधी गारपीट यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम दोन्ही डोळ्यादेखत वाहून गेले. पाण्याअभावी रब्बी पिकेसुद्धा संकटात सापडली आहेत. तर दुसरीकडे, अनेक संकटापासून वाचविलेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नेमके जगावे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र, जिथे सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आहे, तेच तालुके सरकारने निवडले, अशी टीका झाल्यानंतर १ हजार २०० महसूल मंडल हे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले. या घोषणेला बरेच दिवस झाले. पण, अद्याप एक नवा पैसा दुष्काळग्रस्तांना मिळाला नाही. दुष्काळाच्या सुविधाही मिळाल्या नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. शासकीय सुविधा तातडीने द्याव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.