मुंबई – ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कुणी मांडला, असा सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विचारला आहे. तसेच, याबाबत आयुक्त इक्लाबसिंग चहल ( Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहलं आहे. महापौर आणि लोकप्रतिनिधी नसताना हे कंत्राट काढलं कसं, असेही आदित्य ठाकरेंनी विचारलं.
काय म्हणाले ठाकरे ?
1) आदित्य ठाकरे म्हणाले की, हे साधरणतः 400 किमीच्या रस्त्यांची निवड कोण केली? हे रस्ते करायचे म्हणून कोणी सुचवले? एरवी नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी कामाची नावे सूचवतात. ती नावे प्रभाग समितीमध्ये येतात. तिथून रस्ते विभागाकडे जातात. या कामांसाठी अगदी छोट्या गल्ल्यातले रस्ते निवडले आहेत. तर पेडर रोड, मरीन ड्राइव्ह येथील रस्ते दहा वर्षांपूर्वीचे केलेले नीट आहेत. मुंबईत रस्त्याखाली 42 युटीलिटी आहेत. त्यामुळे हे काम वाटते तितके सोपे नाही.
2) आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, एखाद्या लोकशाहीत असे 400 किमीचे सहा हजार कोटींचे काम स्वतः प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? एक तर मूळ पद्धत चुकलेली आहे. सध्या कोविड नाही. त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
3) मुंबईतल्या रस्ते कामांसाठी 6 हजार 80 कोटींचा निधी लागणार आहे. त्या निधीची अर्थसंकल्पात काहीही तरतूर केलेली नाही. मग या कामासाठी कुठला निधी वळवणार आहात, असा सवाल त्यांनी केला. प्रत्येक कामासाठी अगोदर तरतूर केलेली असते. मग या कामासाठी कुठला पैसा वापरणार, असा सवाल त्यांनी केला.
4) मुंबईत तुम्ही 400 किलोमीटरचे रस्ते काम करणार आहात. त्यासाठी काही कालमर्यादा, टाइमलाइन दिली आहे का, असा सवाल त्यांनी केला. प्रशासकांनी या कामासाठी कुठलिही कालमर्यादा घालून दिलेली दिसत नाही. हे पाच ते सहा वर्षांचे काम तुम्ही एकाच वेळी तर सुरू करत नाही ना? त्यासाठी वाहतूक पोलिस ते विविध विभागाच्या ना हरकत परवानग्या घेतल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
5) मुंबईतल्या रस्त्यांची कामे देताना त्यांचे दर वाढवून फुगवून हे कंत्राट देण्यात आले. जी कामे 20 टक्के खाली दिली जायची, ती 20 टक्के जादा दराने दिली आहेत. त्यामुळे 10 कोटींचा रस्ता 17 कोटींचा होणार आहे. हे दर तब्बल 66 टक्के फुगवले गेले आहेत. कंत्राटदारांशी वाटाघाटी केल्या असत्या, तर हे काम कमी किमतीमध्ये झाले असते, असा दावा त्यांनी केला.
6) आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या प्रेसनोटमध्ये सांगितले की, ऑगस्ट 2022 मध्ये ‘एसओआर’ बदलला. आता तुम्हाला कॉन्ट्र्रक्टर ‘एसओआर’ वाढवा असे सांगणार का? त्यावर जीएसटी 19 टक्के वेगळा. त्यामुळे रस्ते कामाचा हा खर्च कुठवर जाईल, असा सवाल त्यांनी केला.
7) मुंबईत जर चारशे किलोमीटरचे रस्ते केले. तर त्यामुळे काँक्रिटीकरणाच्या प्रमाणात पुन्हा वाढ होईल. सध्याच 80 टक्के रनऑफ आहे. आता पुन्हा या कामामुळे पुन्हा पूर आला, मुंबईचा जोशीमठ झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.
8) आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतल्या रस्त्यांची कामे हायवे आणि ग्रीनफिल्डची कामे करणाऱ्यांना दिले. ते एका दिवसात 50 ते 100 किमीचे काम करतात. मात्र, या कंत्राटदारांचा मुंबईसारख्या ठिकाणी काम करायचा अनुभव काय आहे. मुंबईतल्या रस्त्याखाली बेचाळीस सेवा-सुविधा पुरवणाऱ्या लाइन आहेत, हे काम त्यांना जमेल का, असा सवाल त्यांनी केला. गद्दारांनी स्वतःला विकले तरी चालेल, पण मुंबईला विकू नका, असे आवाहन त्यांनी केले.
9) मुंबईतल्या रस्ते कामाची व्हिजेटीआय, आयआयटी सारख्या संस्थेकडून टेस्ट करू असे म्हणत आहेत. मात्र, एका पुलासाठी तुम्ही गोखले संस्थेचा रिपोर्ट घेतला नाही. आता ते 400 कोटींच्या रस्त्यासाठी या संस्थांना काय भाव देणार आहेत, असा सवाल त्यांनी केला.
10) मुंबईतल्या रस्ते कामाचे कंत्राट ठराविक लोकांना मिळाले. हे कार्टलायझेशन आहे. साडेचार ते साडेआठ टक्क्यांदरम्यान यांनी निविदा भरली. प्रत्येकाला एकेक पॅकेट मिळाले. या निविदा ठरवून कोणी कमी, तर कोणी जास्त भरल्या. यात घोळ झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.