Photo Credit- Social Media
धाराशिव: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात असून यात मुंबईतील एक खासदार आणि ग्रामीण भागातील पाच खासदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यासाठी या खासदारांनी कायदेशीर बाबींची चर्चा करून ते अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे फुटणाऱ्या खासदारांध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. एकीकडे ठाकरे गटातील फूट चर्चेचा मुद्दा तापत असताना, या संभाव्य घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
धाराशिवमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटासाठी धोक्याच्या घंटा वाजत आहेत, असे संकेत मिळत आहेत. यामागील कारण म्हणजे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे सूचक वक्तव्य. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत, “ते महायुतीचेच आहेत,” असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकर यांनी हसून प्रतिसाद दिला, ज्यामुळे या चर्चेला आणखी जोर मिळाला आहे.
त्वचेसंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, त्वचा
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ओमराजे निंबाळकर शिंदे गटात किंवा महायुतीत सहभागी होणार का? या चर्चेला उधाण आले आहे. याशिवाय, प्रताप सरनाईक यांनी सूचक विधान करत, “येत्या काळात धाराशिवमध्ये राजकीय भूकंप झाला तरी आश्चर्य वाटू नये,” असे म्हटले आहे. त्यांचा हा इशारा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.
पणदुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या संपूर्ण घडामोडींवर मौन राखले आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत का, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. धाराशिवमधील या घडामोडी महायुतीच्या “ऑपरेशन टायगर” च्या यशाचा भाग ठरतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महादेवाच्या या गोष्टी तुमच्या जीवनात अंगीकारा, भरुन जाईल आनंदाने झोळी
2022मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही ओमराजे निंबाळकर खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले, यामागील कारण त्यांचे शिवसेनेशी असलेले भावनिक आणि वैयक्तिक नाते आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आधार दिला आणि “तू माझ्या मुलासारखा आहेस,” असे म्हणत त्यांना आपुलकीचा शब्द दिला होता.
ओमराजेंची जनतेशी असलेली जवळीक त्यांच्या राजकीय प्रवासात महत्त्वाची ठरली आहे. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक जाहीर करून “देशातील पहिला खासदार” होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या कार्यशैलीमुळे त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला. उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले निष्ठेचे नाते आणि जनतेसाठी तत्पर राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे ओमराजे निंबाळकर आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक होत असते.