फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. आज हेच स्वप्न EMI आणि कार लोनमुळे पूर्ण होत आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील अनेक शहरात वाहन खरेदी झपाट्याने वाढली आहे. फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात सुद्धा वाहनांचा वापर वाढला आहे. एका घरामागे आता दोन फॉर व्हीलर, आणि प्रत्येक व्यक्तीमागे एक दुचाकी अशी स्तिथी होत चालली आहे. यामुळे आता वाहतूक कोंडी तर होत आहेच पण पार्किंगचा प्रश्न देखील उद्भवत आहे. त्यामुळेच राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एका महत्वाच्या प्रस्तावाची घोषणा केली आहे. काय आहे प्रस्ताव? चला जाणून घेऊया.
जर तुमच्याकडे वाहनाची पार्किंग असेल तरच तुम्हाला वाहन खरेदी करता येणार अशा योजनेची चर्चा काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सुरु झाली होती. काही वेळानंतर ही चर्चा थंड पडली. पण आता याच चर्चेला पुन्हा वेग आला आहे. याचे कारण म्हणजे राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी एका प्रस्तवाची केलेली घोषणा.
भारतीयांची आवडती Toyota Fortuner झाली महाग, व्हेरियंटनुसार वाढल्या किंमती
सध्या शहरांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, पण पार्किंगच्या सोयींमध्ये वाढ होताना दिसत नाही आहे. म्हणूनच आता महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण अमंलात आणण्याचा विचार करत आहे. या धोरणाअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला कार खरेदी करायची असेल तर त्याला पहिले त्या कारसाठी पुरेशी पार्किंग असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक असणार आहे. शहरी भागात वाढणारी वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाची घोषणा केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण बनत चालली आहे. अनेकजण त्यांच्या गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर पार्क करत आहेत, कारण त्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधाच नाही. यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाहनांच्या अनियंत्रित पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
पुढे सरनाईक म्हणतात,” अनियंत्रित पार्किंगमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सेवांमध्येही अडथळा येतो. अनेक सोसायट्यांमध्ये मोकळ्या जिगेचा वापर पार्किंगसाठी केला जातो. ज्यामुळे आपत्कालीन सेवांच्या कामकाजात अडथळा येत आहे.
Kia Syros Vs Skoda Kylaq: कोणती कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर?
या प्रस्तावाची घोषणा झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. गरिबाने आता कार विकत घेऊ नये का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. यावर भाष्य करताना सरनाईक म्हणाले की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आम्ही विरोधात नाही. ज्यांच्याकडे खाजगी पार्किंगची सुविधा नाही आहे ते सार्वजनिक पार्किंगमध्ये जागा रिझर्व्ह करून कार खरेदी करू शकतात. आम्ही असं म्हणत नाही की, गरीब लोकांनी गाड्या खरेदी करू नयेत, पण त्यांना पार्किंगची व्यवस्था करावी लागेल.