मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court, Mumbai) जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र यावर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान मलिक यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी ६ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. ३० नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यांनी प्रकृती अस्वस्थाचा दाखला देत उच्च न्यायालयाकडे ताताडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र यावर आज मंगळवारी उच्च न्यायालयाकडे ताताडीने सुनावणी देण्यास नकार दिला. परंतु मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तसेच वैद्यकीय गरज भासल्यास सुट्टीकालीन न्यायालयाकडे ही दाद मागण्याची मलिक यांना मुभा आहे.
काय आहे प्रकरण :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी याआधीही अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा प्रत्येक अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक सुरुवातीला आर्थर रोड कारागृहात होते. मात्र, त्यांना मृतपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.