ठाणे / स्नेहा जाधव : दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. मात्र प्रशासन याबाबत हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा गाजावाजा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.
2012 साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो ची घोषणा करत मंजुरी दिली होती.त्यानंतर 2014 साली सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत मेट्रो ची हवेत उडणारी मेट्रो केली.तेव्हापासून हे काम रखडलेलेच आहे.
चार वेळा दिलेल्या डेडलाइन उलटून देखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.मेट्रो मार्गिका पूर्ण नाही, काही ठिकाणी मेट्रोचे पिलर्स व त्यावर ट्रॅक उभारलेले नाही,कारशेड उभारणीचा अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला काम दिल्याने अद्यापपर्यंत न उभारलेले कारशेड ,कारशेडची उभारणीत स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप त्यामुळे पळून गेलेली लोक, मेट्रो स्टेशन ची उभारणी नाही, इतर मेट्रो बोगींचे निर्माण कधी पूर्ण होणार ,टॉयलेट,तिकीट काउंटर,कॅफेटेरिया नाही तसेच मेट्रोच्या इतर चाचण्या, परवानग्या आणि इतर कामांसह पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असतानाही गाजावाजा करत केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी मेट्रोची चाचणी घेतल्याचा आरोप ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.यावेळी ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे,रवी कोळी देखील उपस्थित होते.
काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने सेवा रस्त्याची मागणी लावून धरत केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्विस रोड विकसित केले होते. घोडबंदर रोड येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्विस रोड महापालिकेला करता आला नाही परंतु सेवा रस्ता अस्तित्वात असल्याचे पकडून त्यावेळी बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. परंतु 2014 नंतर मेट्रो येत असल्याने बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये असे पत्र मेट्रो ने महापालिकेला दिले असतानाही नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या तसेच मेट्रो चे पिलर सेवा रस्ता व घोडबंदर रस्ता त्याच्या मध्यभागी उभारल्याने एकत्रीकरणानंनंतर ते रस्त्याच्या मध्यभागी येणार असल्याने वाहतुकीला अडथळा ठरणार आहेत.
एकत्रिकरणानंतर अनेक जुनी गृह संकुले ही रस्त्यालगत येणार आहेत.यामुळे नागरिकांचा विरोध असतानाही घोडबंदर-सर्विस रोड एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.जर हा सर्विस रोड पुर्वदुती महामार्गावर विलीनीकरण झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूस आठ ते दहा लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येस पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स पोहचणार कशी ?त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेले सर्विस रोड एकत्रीकरणाचे काम तातडीने थांबवून वाहतूक कोंडीवर उपाययोजन कराव्यात व डिसेंबर अखेर मेट्रो चालू होणार असलेबाबत श्वेतपत्रिका काढावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करून जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.