वडूज : बहुतांश ठिकाणी शेतकरी शेती पिकांच्या बाबतीत अडचणीत आला असल्याची अनेक उदाहरणे समाजात बघायला मिळतात, मात्र काही ठिकाणी शेतकरी अथक प्रयत्न आणि सुयोग्य नियोजनाच्या जोरावर विक्रमी पिक उत्पन्न घेत असतात. रहाटणी (ता. खटाव) येथील प्रगतीशिल शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी 48 गुंठयात 144 टन एवढे आडसाली लागण ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे.
तरी या परिसरातील ऊस उत्पादनात आता पर्यंतचे हे सर्वात जास्त उत्पन्न समजले जात आहे. तरी रहाटणी गावाला उरमोडी पोट पटाच्या पाण्याचे वरदान लाभले असल्याने या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने त्यांनी या ऊस शेतीला ठिंबक सिंचन करुन 86032 या ऊसाची जुन महिन्यात आडसाली लागण केली. ऊस लागण करताना जादा उत्पन्न काढण्याचा मानस ठेऊन मोठी मेहनत घेत त्यांनी आडसाली ऊसास शेणखत व कोंबड खत, लिंबोळी पेंड यासह रासायनिक खतांचा वापर योग्य प्रकारे केला.
अनेक दिवसाचे स्वप्न
वेळोवेळी जैविक फवारणीचा अवलंब करुन स्वतः बॅलरमध्ये खत मिसळून आळवणी व फवारणी केली, यावर्षी ऊसाचे जादा उत्पन्न काढण्याचे हे अनेक दिवसाचे स्वप्न होते. त्यास यावेळी यश आले असल्याची भावना देविदास थोरात यांनी व्यक्त केली. त्यांनी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने व सह्याद्री कारखान्याच्या शेती विभागाने त्यांचे अभिनंदन केले.