मंगळवेढा : ब्रम्हपुरी येथील बालाजी गोपाळ कोकरे (वय 30) याने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसांत झाली आहे. दरम्यान, बालाजी कोकरे (Balaji Kokare) आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी (Suicide Note) लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे बालाजी कोकरे याने आत्महत्या नेमकी का केली याची माहिती समजू शकली नाही.
याबाबत मधुकर कोकरे यांनी पोलिसांत माहिती दिली. यामध्ये 25 मे रोजी येणकी येथील शेतात पिकास पाणी देत असताना सकाळी 11.30 वाजता ब्रम्हपुरी येथील राजेंद्र धोंडीराम कोकरे यांनी फोन करुन कळविले की, तुमचा चुलत भाऊ गोपाळ गोविंद कोकरे यांचा मुलगा बालाजी गोपाळ कोकरे याने त्याच्या राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बालाजी याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतल्याने त्याचा मृतदेह त्या अँगलला तसाच अडकून होता.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे हे करीत आहेत. बालाजी याने ही आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अस्पष्ट आहे.