
‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा
मिरा-भाईंदर शहरात क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीसाठी मोठ्या संख्येने दुचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. वेळेत डिलिव्हरी पूर्ण करण्याच्या दबावामुळे काही चालकांकडून भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविले जात असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. काही ठिकाणी अल्पवयीन चालक, हेल्मेटचा वापर न करणारे चालक तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेली वाहने आढळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, आरटीओ विभागाच्या कारवाईअभावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
युवासेनेने शहरातील ऑनलाइन डिलिव्हरी वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. वैध परवाना, आरसी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा हेल्मेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार वाहने जप्त करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही युवासेनेने केली आहे.
येत्या ४८ तासांत आरटीओ विभागाने कारवाई सुरू केली नाही, तर युवासेना स्वतः रस्त्यावर उतरून बेकायदेशीर डिलिव्हरी वाहने रोखेल आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निखिल तावडे यांनी दिला आहे.
या प्रकरणात प्रशासनाने केवळ नोटीस देऊन थांबू नये, तर प्रत्यक्ष तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी युवासेनेची भूमिका आहे. यासाठी प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
निर्धारित मुदतीत कारवाई झाली नाही तर युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहतूक विभाग किंवा संबंधित प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, झेप्टोच्या वाहनांबाबतचे ‘बेकायदेशीर’ असल्याचे आरोप युवासेनेकडून करण्यात आलेले आहेत. संबंधित वाहनांनी नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि त्यांच्याकडे आवश्यक परवानग्या आहेत की नाहीत, हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होईल. तसेच या आरोपांवर झेप्टोची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यास या प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला