
'आई तुळजाभवानी' मध्ये सृजन देशपांडेची महत्त्वाची भूमिका
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या अद्वितीय पर्वाचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. देवी जगदंबा आणि महादेव यांच्या दैवी भेटीचा हा अलौकिक क्षण जवळ आलाय आणि याशिवाय या मालिकेचे ४०० भाग लवकरच पूर्ण होणार आहेत. प्रेक्षकांची ही मालिका आवडती ठरली आहे आणि या मालिकेतील कलाकारांचे अभिनयही वाखाणण्याजोगे आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेते राजेश देशपांडे यांचा मुलगा सृजन देशपांडे महादेवांच्या रूपात दिसणार आहे. शिवाची ही भूमिका सृजन साकारतोय आणि या खास निमित्ताने ‘नवराष्ट्र’ने त्याचा अनुभव विचारला आणि ही भूमिका सृजनला कशी मिळाली, तो या भूमिकेसाठी काही खास कष्ट घेतोय का? यावर त्याने अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली आहेत
शिवाची ही भूमिका का स्वीकारली?
सृजनने सुरूवातीलाच स्पष्ट सांगितलं की, ‘मला तर हा महादेवाचाच आशिर्वाद वाटतो, कारण आमचं कुलदैवत मंगेशी आहे आणि ही भूमिका मंगेशीनेच माझ्यापर्यंत पोहचवली असं मला वाटतं. याशिवाय ही भूमिका अत्यंत इंटरेस्टिंग वाटली आणि म्हणून लगेच होकार दिला.’ यामागचा एक मजेदार किस्साही सांगायला सृजन विसरला नाही. पुढे तो म्हणाला की, प्रवीण पावसकर हे कास्टिंग करतात आणि नेहमीच मला फोन करायचे की एखादी भूमिका आहे, त्यात कोणी फिट होत असेल तर सांग. असाच त्यांचा फोन आला आणि ते काही बोलायच्या आत म्हटलं की, कधीतरी मला पण काम देत चला, त्यावर ते म्हणाले की, ही भूमिका तुझ्यासाठीच आहे.’ तसंच ही भूमिका व्यवस्थित ऑडिशन आणि लुक टेस्ट करून मिळवल्याचंही सृजन सांगायला विसरला नाही.
महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड
काम करताना काही खास तयारी केली का?
सृजन म्हणाला ‘ही माझी पहिलीच पौराणिक अर्थात Mythological मालिका आहे. याचे तंत्र अगदी वेगळे आहे. सुरुवातील थोडं बाचकायला झालं पण नंतर मजा यायला लागली. आजपर्यंत कधीही ग्रीन स्क्रिनवर काम केलं नव्हतं. हे पहिल्यांदाच काम करतोय. बाकी मालिका करताना आजूबाजूची परिस्थिती, वातावरण समजत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस पडताना त्याचे सीन करता येतात, पण इथे तसं नाही. केवळ ग्रीन स्क्रिनवर तुम्हाला सीन काय आहे हे समजून डोक्यात ठेऊन त्याप्रमाणे संवाद आणि चेहऱ्यावर भाव आणावे लागतात. हे अन्य मालिकांपेक्षा वेगळं आहे आणि ते करताना आता सवय होतेय’
काही स्टंट करणार आहेस का?
यावर अगदी उत्साहाने सृजनने उत्तर दिले, तो म्हणाला, ‘नुकताच मी स्टंट शूट केला आहे आणि अगदी पाय तुटता तुटता वाचलोय. हा एक वेगळाच अनुभव आहे. तांडव स्टेप्स असणारा असा हा स्टंट पहायला प्रेक्षकांनाही नक्कीच मजा येणार आहे. अगदी याच आठवड्यात ही कथा पहायला मिळेल’
अभिनेता राजेश देशपांडे यांचा मुलगा म्हणून दडपण येतं का?
यावर सृजन पटकन म्हणाला की, ‘पूर्वी खरंच यायचं पण आता अजिबात येत नाही. कारण बाबाने सांगितलेलं वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलंय, तू humble राहिलास तर लोक तुझे Fumble देखील पचवतील. अपयश वगैरे काहीच नसतं, आपण जे काम करतो ते सुपरहिटच ठरणार हा विश्वास घेऊनच कामाला सुरूवात करायची’, हेच मनाशी ठरवून काम करायला सुरूवात केल्याचंही त्याने आवर्जून सांगितलं.
दरम्यान प्रेक्षकांनाही आई तुळजाभवानीमधून वेगळाच अनुभव मिळणार असून सध्या महादेव आणि जगदंबा यांचे फुलणारं नातं दिसून येणार आहे. आता ही मालिका अजून कसे वळण घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्राचं कुलदैवत ‘आई तुळजाभवानी’ ची महागाथा दिसणार छोट्या पडद्यावर