(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास ,जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. ही मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर अप्रतिम ग्राफिक्सचा कथानक सादर करण्यासाठी चपखल वापर करून प्रेक्षकांना नेत्रसुखद दृश्य अनुभव देणारी ही आजवरची एकमेव मालिका ठरली असून, त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मालिकेच्या याच अद्भुत ग्राफिक्स वैशिष्ट्याचा महा-आविष्कार या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. एका पर्वतकड्यावर उभ्या षड्रिपु मत्सर रूपी उमा. तिच्या मागे मोठ्या रूपातील मत्सर, तर बाजूला पाच षड्रिपु. एकाक्षणात हे सगळे रिपू उमामध्ये एकत्र होतात, आणि उमा प्रचंड महाकाय, महारिपूचे रूप धारण करते.
समांतर दृश्यात जगदंबा दिसते, तिच्या पाठीमागे विजेच्या कल्लोळात आई तुळजाभवानी प्रकट होते. जगदंबेच्या मस्तकावर उभा डोळा उघडतो, आणि त्यातून दैवी किरण बाहेर पडतात. ते किरण सहा रिपूंना स्पर्श करून त्यांना हवेत विरघळवतात आणि लालसर-केशरी, जळत्या षटकोणात रिपूंचे रुपांतर होते.त्या षटकोणाकडे रोखून पाहणाऱ्या जगदंबा आणि तुळजाभवानी, आणि त्यांच्या समोर षड्रिपु मत्सर रूपी उमा – षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा अद्भुत महासामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दिवाळी २०२५: घरबसल्या कुटुंबासोबत पाहा ५ धमाल बॉलिवूड चित्रपट!
‘आई तुळजाभवानी’ ही कलर्स मराठीवरील एक भव्य पौराणिक मालिका आहे जी महाराष्ट्रातील आदिशक्ती तुळजाभवानी देवीच्या गाथेवर आधारित आहे. या मालिकेत देवीच्या अद्भुत शक्ती, तिचा दैवी प्रवास आणि षड्रिपुंसारख्या दुष्ट शक्तींशी झालेला महासंघर्ष याचं अप्रतिम चित्रण करण्यात आलं आहे. मालिकेची मुख्य भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत असून, त्यांच्या अभिनयातून देवी तुळजाभवानीचं सामर्थ्य, करुणा आणि तेज प्रभावीपणे सादर केलं जातं.
ही मालिका मराठी टेलिव्हिजनसाठी एक नवा टप्पा मानली जाते कारण यात उच्च दर्जाचे व्हिज्युअल ग्राफिक्स, भव्य सेट्स आणि दमदार कथानकाचा सुंदर संगम दिसतो. ‘मत्सर’ आणि इतर पाच षड्रिपु विरुद्ध तुळजाभवानीचा संघर्ष, जगदंबेचं प्रकट होणं आणि दैवी तेजाचं दर्शन या मालिकेचं वैशिष्ट्य ठरतं. भक्ती, शक्ती, आणि नारी सामर्थ्य यांचा उत्सव साजरा करणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.