आई तुळजाभवानी मालिकेतील अभिनेत्री पूजा काळेशी खास बातचीत (फोटो सौजन्य - Instagram)
आपल्याकडे पौराणिक कथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या नवरात्र चालू आहे आणि कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’चा उल्लेख केला जाणार नाही असं कसं होऊ शकतं? नुकताच मालिकेच्या प्रोमोमधून आई तुळजाभवानी योगनिद्रेतून आता बाहेर येणार असून भक्तांसाठी पुढे काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा काळे ही घराघरात पोहचली आहे आणि आपल्या कामातून सर्वांना आपलंसं करून घेत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने नवराष्ट्रने पूजा काळेसह खास बातचीत केली आणि तिला ही भूमिका कशी मिळाली आणि तिने यासाठी कशा पद्धतीने मेहनत घेतली याबाबत जाणून घेतले आहे.
ही भूमिका कशी मिळाली?
पूजाने सांगितले की, ती भरतनाट्यम, ओडिसी आणि कथक डान्सर आहे आणि तिला या भूमिकेसाठी इन्स्टाग्रामवर विचारण्यात आले होते. पण अभिनयाचा ‘अ’देखील माहीत नसल्याने तिने चक्क नकार दिला होता. इतकंच नाही तर दाक्षिणात्य भाषेचा घरी प्रभाव असल्याने तिचं मराठीही तितकंसं चांगलं नव्हतं त्यामुळे तिला आपण हे काम करू शकतो असा अजिबातच विश्वास नव्हता.
मात्र म्हणतात ना नशिबात असतं तेच होतं आणि म्हणूनच २-३ वेळा नकार देऊनही तिला दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून प्रोत्साहन मिळालं आणि तिने लुक टेस्ट दिली आणि त्यानंतर तिला ही भूमिका मिळाली. ‘मी लहानपणापासूनच देवीची भक्त आहे आणि त्यामुळेच देवीने तिच्या इच्छेने ही सेवा माझ्याकडून करून घेतली’ असं स्पष्टपणे पूजाने सांगितले. तसंच रिसर्च टीम आणि मकरंद माने यांच्यासह या भूमिकेसाठी खूप चर्चा केली आणि मगच अभ्यास करून ही भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही तिने आवर्जून सांगितले.
भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
भूमिका करताना कोणते आव्हान समोर आले?
‘आई तुळजाभवानी’ साकारताना अनेक आव्हानं होती. सर्वात पहिलं म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास, उच्चार यावर काम करणे. या भूमिकेसाठी पूजाने ‘तुळजा महात्म्य’ पुस्तक पूर्ण वाचून काढले आणि जास्तीत जास्त देवीची माहिती मिळवली. तसंच तिच्या भरतनाट्यम, कथक आणि ओडिसी नृत्याचा हावभावासाठी तिला खूपच फायदा झाला.
याशिवाय तिने लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले कारण युद्धाचे सीन करताना तिला योग्य पद्धतीने ते साकारायचे होते. तसंच तलवारबाजीचेदेखील शिक्षण घेतले आणि त्याची योग्य तालीम केली. कोणतंही शस्त्र चालवण्याची एक पद्धत असते आणि त्यासाठी विशिष्ट देहबोलीची गरज भासते आणि हे करताना पूजाला खूप मेहनत करावी लागली. पण हे सर्व करताना तिला खूपच आनंद होतोय आणि मजा येत असल्याचेही तिने सांगितले.
स्टंट करताना भीती वाटते का?
यावर उत्तर देताना पूजा म्हणाली की, ‘पहिलाच सीन करताना मला तिसऱ्या मजल्यावरून हार्नेस लाऊन उडी मारायची होती आणि कधीही मी आयुष्यात असं काही केलं नव्हतं. पण तुळजाभवानीनचं नाव घेतलं आणि सीन करताना वेगळीच एनर्जी आली. मनातील सर्व भीती दूर पळून गेली आणि मी वनटेक सीन केला होता’, लहानपणापासूनच घरात देवीची पूजा करत असल्याने आणि देवीभक्त असल्याने तुळजाभवानीचा आशिर्वादच आहे की, सर्व काही व्यवस्थित पार पडतं असंही पूजा हसतहसत सांगते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे जपतेस?
थोडं गंभीरपणाने पूजाने याचं उत्तर दिलं की, ‘तुळजाभवानीची भूमिका करणं हे तसं तर खरंच मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ लागतंच. काम करताना डोकं शांत ठेवणं खूपच गरजेचे आहे आणि याशिवाय डोक्यात वा मनात कोणतीही नकारात्मकता असून चालत नाही. संवाद खूपच मोठे असतात पण त्याचं टेन्शन न घेता काम केलं की शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि याशिवाय टीमकडून पूर्ण पाठिंबा असतो त्यामुळे कोणताही त्रास होत नाही.’
प्रेक्षकांचा अनुभव
‘आई तुळजाभवानी’चं काम करायला सुरूवात केल्यानंतर काही महिन्यातच पूजा एका सलॉनमध्ये गेली होती आणि तिने यावेळचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ‘तुळजाभवानीच्या वेषात खूप मेकअप असतो त्यामुळे आपल्याला पटकन कोणी ओळखेल असं वाटलं नव्हतं. पण सलॉनच्या बाहेर काही महिला होत्या आणि त्यांनी ओळखून पायच धरले आणि तुमचा आशिर्वाद ठेवा असं म्हणाल्या. हे पाहून मला धक्काही बसला, भारावून गेले आणि जबाबदारी वाढली याची जाणीवही त्यावेळी झाली.’
करिअरचा विचार
पूजाचा अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार कधीच नव्हता. मात्र गेले १ वर्ष ती तुळजाभवानीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आता अभिनयात करिअर करण्याचा विचार करणार का? विचारल्यावर ती म्हणाली, ‘पूजा काळे म्हणून मी सध्या कमीच जगतेय गेल्या १ वर्षापासून आई तुळजाभवानी देवीचं आयुष्य जगतेय. तिने कशा कळा सोसल्या असतील, भक्तांसाठी ती तारणहार म्हणून कशी राहिली असेल, हेच सर्व स्पेशल फिलिंग अजूनही अनुभवतेय. मात्र अभिनय म्हणून करिअर हा विचार करायचा की नाही याबाबत विचारच नाही केला’, नृत्यावर कायम प्रेम होतं आणि राहील हेदेखील सांगायला ती विसरली नाही.
सध्या नवरात्रीच्या दिवसात तुळजाभवानी मालिकेत साडेतीन शक्तिपिठांबाबत माहिती देण्यात येणार आहे आणि हे प्रेक्षकांना बघायला आणि अनुभवायला खूप आवडेल त्यामुळे ते कलर्स मराठीवर ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नक्की पहा असाही संदेश तिने आपल्या चाहत्यांना यावेळी आवर्जून दिलाय.