शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल; वाचा कविता...
आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवरायांची जयंती राज्यासह देशासह अवघ्या जगभरात आज (१९ फेब्रुवारी) साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती आहे. महाराजांची जयंती म्हटल्यावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मराठीसह काही बॉलिवूड सेलिब्रिटी मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शिवजयंती’च्या शुभेच्छा पोस्टच्या माध्यमातून देताना दिसत आहेत. सुबोध भावे, स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, अश्विनी महांगडे, नेहा शितोळे, पृथ्वीक प्रताप, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी ‘शिवजयंती’निमित्ताने खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
‘शिवजयंती’निमित्त बिग बॉस फेम अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “लायकी नसतानाही कपाळावर चंद्रकोर आणि…”
दरम्यान, लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेल्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने छत्रपती शिवाजी महाराजांवर खास कविता केली आहे. संकर्षणने लिहिलेली ही छोटीशी आणि सुंदर कविता इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्याने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली कविता
शौर्य असे जे चार शतकं, जगी जिवंत राहिले
कर्तृत्वं असे की ब्रम्हांडाने, केंव्हाच नाही पाहिले
दृष्टं काढण्या समर्थ नाही, काजळही त्या तेजाची
हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची
पुढल्या जन्मी शंभो इतुकी, ईच्छा पूर्ण व्हावी
छत्रपती शिवरायांची, प्रत्यक्षं भेट व्हावी
ठेऊनी मस्तक पायावरती, म्हणेन मला आशिष द्या
ऊपकार करा जगावर राजे, या हो या पुन्हा या…
– संकर्षण गोविंद कऱ्हाडे
संकर्षणने शेअर केलेली ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संकर्षण सध्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत करताना दिसतोय. याशिवाय ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात अभिनय करतोय. संकर्षणचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.