'अशोक मा. मा' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी रसिका सांगतेय तिचा अनुभव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असणारी मालिका म्हणजे अशोक मा मा. कलर्स मराठीवरील ही मालिका लोकांच्या मनात घर करून राहिली आहे आणि अशोक सराफ यांच्या बरोबरीने प्रमुख भूमिका साकारणारी कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका वाखारकर. अशोक मामांच्या सुनेच्या भूमिकेत असणारी रसिकाचा नुकताच साखरपुडाही पार पडला आहे. रसिका या मालिकेत भैरवी नावाचे पात्र साकारत असून तिचे अधिकाधिक सीन हे दिग्गज कलाकार अशोक सराफ यांच्यासह आहेत. या मालिकेने प्रेक्षकांंच्या मनाची चांगलीच पकड घेतली असून रसिकाचे कामही प्रेक्षकांना खूपच भावतंय. तिच्या कामाची प्रशंसाही होत आहे.
नवराष्ट्रने या मालिकेच्या निमित्ताने रसिकाशी खास बातचीत केली आणि रसिकानेही अगदी मनमोकळ्या गप्पा मारत आपल्या चाहत्यांसाठी उत्तरं दिली आहेत. खरं तर रसिका या क्षेत्रात कशी आली आणि तिला ही मालिका आणि भूमिका कशी मिळाली याबाबत तिने सांगितले आहे. तुम्हीही उत्सुक असाल ना जाणून घेण्यासाठी? चला तर मग सुरू करू रसिकाशी 1 To 1 संभाषण
अभिनयात करिअर करायचे कधी ठरवले? सुरूवात कशी झाली?
अभिनयात करिअर करायचे अगदी लहानपणापासूनच ठरवले होते. पण नक्की याची सुरूवात कशी करायची आणि कसे पदार्पण करायचे याबाबत काहीच माहीत नव्हते, कारण या क्षेत्रात कोणाचीही ओळख नव्हती. त्यामुळे कधी कोणासमोर याबाबत वाच्यता केली नव्हती, असे रसिकाने अगदी स्पष्टपणे सांगितले. पण भरतनाट्यम शिकत असताना अभिनयाचा तो ‘किडा’ होताच. स्टेज परफॉरर्मन्सचा अनुभव नृत्यामुळे मिळाला होता. पण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत नाटकात तिला पहिली संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत तिने प्रायोगिक नाटक, लहान लहान भूमिका मिळवल्या आणि मग तिच्या या अभिनयाच्या आवडीला कधीच ब्रेक लागला नाही.
पहिली मालिका ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ करताना तिला खूप चांगला अनुभव मिळाला आणि त्याच कामातून तिला अशोक मा. मा. ही दुसरी मालिका मिळाली असं रसिकाने अभिमानाने सांगितले.
अशोक मा. मा. मधील भूमिका कशी मिळाली?
पहिल्या मालिकेतील काम पाहून निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्याला अप्रोच केले आणि त्यानंतर लुक टेस्ट, ऑडिशनदेखील आपण दिली होती असं रसिकाने सांगितलं. पण काम पाहून आधीच भूमिका निश्चित करण्यात आली होती असंही ती म्हणाली आणि अशोक सराफ यांच्याबाबत तिने यावेळी आवर्जून नमूद केले.
तिची पहिली मालिका ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही अशोक सराफ यांनी पूर्ण पाहिली होती आणि तिचे कामही त्यांना खूप आवडले होते हे तिला त्यांच्याबरोबर काम करायला लागल्यानंतर कळले आणि तिच्या कामाची पोचपावती मिळाल्याचा मोठा आनंदही तिला मिळाला.
भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
अशोक सराफ या दिग्गज अभिनेत्यासह काम करताना दडपण होतं का?
रसिकाने पटकन ‘हो’ असं उत्तर दिलं. पण तितक्याच पटकन तिने सांगितले की, ज्या क्षणी त्यांची भेट झाली, त्यावेळी हे दडपण कुठच्या कुठे निघून गेलं. अशोक सराफ हे काम करताना समोरच्या कलाकाराला अत्यंत सहजता देतात आणि त्यामुळे काम करणंही सोपं होतं. त्यांची एनर्जी इतकी कमाल आहे की, त्या एनर्जीमुळे काम करण्यात अत्यंत सहजपणा येतो आणि नव्या व्यक्तीचाही चांगला Rapport तयार होतो आणि काम करताना मजा येते.
इतक्या मोठ्या कलाकारासह काम करायला मिळणं हे नक्कीच सुरूवातील दडपण येण्यासारखे होते. पण त्यांना भेटल्यानंतर आणि काम सुरू केल्यानंतर अगदी आता कम्फर्टेबल असल्याचे रसिकाने आवर्जून सांगितले.
तर अशोक सरांकडून काय शिकायला मिळाले विचारल्यावर रसिका म्हणाली की, त्यांंच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. टीमला धरून कसं रहायचं, हसतखेळत कसं काम करायचं, काम करत असताना सकारात्मक एनर्जी पास करणं किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने संवादाचं टायमिंग आलं पाहिजे हे सर्व शिकायला मिळालं. अशोक सराफ हे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक अभिनयाची शाळाच आहे.
अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं
भविष्यात कोणत्या भूमिका करायला आवडतील?
रसिकाने आतापर्यंत दोन मालिकांमध्ये काम केलं आणि दोन्ही भूमिका तिने उत्तम साकारल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्या भूमिका तिला निवडायला आवडतील असं विचारल्यावर ती पटकन म्हणाली, ‘Challenging वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला मला नक्कीच आवडतील’. अशा भूमिका ज्यात तिला बरंच काही करायला मिळेल आणि वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा दाखवता येतील.
सध्या अशोक मा. मा. या मालिकेत रसिकाची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडतेय आणि तिच्या चाहत्यांमध्येही सतत वाढ होताना दिसतेय. अशोक मा. मा आणि भैरवी कुटुंबासाठी कसे एकत्र राहणार? घरात आलेल्या समस्यांना कसे एकत्र तोंड देणार आणि त्यातून कोणता मार्ग काढणार यासाठी आता प्रेक्षकांना मालिकाच पुढे पहावी लागणार असंही रसिकाने जाता जाता सांगितले.