(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पहिल्या भागाच्या तुलनेत अधिक दमदार कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाने असा एक बेंचमार्क निर्माण केला आहे की, सध्या भारतीय सिनेमातील दिग्गजांनाही त्यासमोर स्वतःला कमी पडल्यासारखे वाटत आहे. आदित्य धर यांनी आपल्या दिग्दर्शनातून चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडत इतिहास घडवला आहे.
‘धुरंधर: द रिवेंज’ या चित्रपटाची कथा पहिल्या भागानंतर पुढे सरकते. रणवीर सिंग साकारत असलेला हमजा अली मजारी हा गुप्त मोहिमेवर असून भारतीय गुप्तहेर संस्था RAW साठी पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे. तो ल्यारीपासून कराचीपर्यंतच्या सत्ताकेंद्रांमध्ये शिरकाव करत, तेथील गुन्हेगारी टोळ्या आणि राजकीय रचनेत आपले स्थान निर्माण करतो आणि त्यांना पराभूत करतो.
‘धुरंधर २’ ने १४ व्या दिवशी केली एवढी कमाई?
भारतातील दहशतवादी कारवायांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन लढणाऱ्या या कथानकाने सध्या प्रेक्षकांची मने जिंकली असून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सर्वांच्या कामाचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘धुरंधर 2’ने 14 व्या दिवशीही देशभरात दमदार कमाई कायम ठेवली आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आतापर्यंतची नंबर 1 फिल्म ठरलेली ‘पुष्पा 2’ला जोरदार टक्कर दिली आहे. ‘पुष्पा 2’ने 14 व्या दिवशी 20.55 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर Sacnilk च्या अहवालानुसार ‘धुरंधर 2’ने 14 व्या दिवशी 20.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘धुरंधर 2’ ची जगभरातील कमाई
एकूणच, या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 920.02 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसेच, बुधवारी देशभरात चित्रपटाचे 17,906 शो प्रदर्शित झाले होते. इंडिया ग्रॉस कलेक्शनच्या बाबतीतही ‘धुरंधर 2’ ने 1,101.47 कोटी रुपयांची कमाई करत भक्कम यश मिळवले आहे. ‘धुरंधर 2’च्या वर्ल्डवाइड कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने परदेशात एकट्यानेच 365.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 व्या दिवशीही चित्रपटाने परदेशात दमदार कामगिरी करत सुमारे 7.00 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
Sourav Ganguly यांच्या बायोपिकचे शीर्षक जाहीर; Rajkummar Rao ने केली शूटिंगला सुरुवात
‘धुरंधर 2’चे शूटिंग कुठे झाले?
एकूणच, 14 दिवसांत ‘धुरंधर 2’ची जागतिक कमाई अंदाजे 1,466.47 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम प्रस्थापित करत आहे. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगबाबत सांगायचं झाल्यास, या चित्रपटात पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध 26/11 सारख्या हल्ल्याचा बदला घेण्याची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या भागासोबतच या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते.
चित्रपटाची मुख्य शूटिंग जुलै 2024 मध्ये बँकॉक, थायलंड येथे सुरू झाली आणि ऑक्टोबर 2025 मध्ये पूर्ण झाली. याशिवाय भारतातील पंजाब, चंदीगड, महाराष्ट्र, लडाख आणि हिमाचल प्रदेश येथेही चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या ठिकाणांपैकी काही भागांचा वापर पाकिस्तानमधील दृश्यांसाठी करण्यात आला आहे.






