(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठमोळा अभिनेता घैर्य घोलप सध्या चर्चेत आला आहे. त्याच्या ‘येक नंबर’ आणि ‘तानाजी’ या चित्रपटांमधील कामगिरीने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. धैर्यच्या लाडक्या बहिणीने, स्नेहल घोलपने, मानाच्या Forbes India २०२६ च्या ‘४० अंडर ४०’ यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. यामुळे सिनेमा आणि उद्योग क्षेत्रातील कुटुंबाची गौरवशाली ओळख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
धैर्यला ‘येक नंबर’ या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्याने त्याचे व्यक्तिमत्व आणखी चमकले आहे. त्याने आपल्या बहिणीसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांमध्ये उत्साह आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.
पोस्टमध्ये धैर्यने लिहिले की, “फोर्ब्स ४० अंडर ४० च्या प्रतिष्ठित लिस्ट मधे माझ्या बहिणीचं नाव झळकलं व पुरस्कार घरी आला आणि माझ्या डोळ्यासमोरून इतक्या वर्षांचा फ्लॅशबॅक गेला. माझे बाबा बोर्डात आले होते त्यामुळे साहजिकपणे त्यांच्या माफक अपेक्षा अश्या होत्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी अभ्यासात कधी मागे पडू नये. त्यामुळे ते आमच्या लहानपणापासून आम्हाला जमेल त्या पद्धतीने अभ्यासात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. त्यात आमची ताई कायम त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायची आणि पुस्तकांमध्ये हरवलेली असायची. (आजदेखील तसंच चित्र आहे म्हणा) आम्ही शाळा-कॉलेज मध्ये असताना बाबा सकाळी ५ वाजता उठायचे आम्हाला ड्रायफ्रूट्स आणि गरम दूध करून ठेवायचे मग आम्हाला उठवायचे आणि अभ्यासाला बसवायचे आणि मग ऑफिस ला जायचे. एखाद्या गोष्टीची तपश्चर्या आणि कठोर मेहनत करत नाही तोपर्यंत यश साध्य होणे नाही. जे करायचं आहे ते प्रचंड प्रामाणिकपणे करा . जीव तोडून मेहनत केली तर सगळं साध्य होऊ शकतं होत नाही, जमत नाही म्हणजे काय ? लात मारीन तिथे पाणी काढीन असं असावं. हि त्यांची शिकवण होती. ताईला तेंव्हा च कळालं होतं हे त्यामुळे तिने नंबरात येणं कधी सोडलं नाही.ती बिचारी मन लावून इंग्रजी, गणित, विज्ञान असे कठीण विषय बाबांकडून शिकत देखील बसायची . तेव्हा मला ते दंगल मधल्या आमीर खान सारखे वाटायचे आणि ते माझ्याकडे तारे जमीन पर मधल्या इशान अवस्थी सारखे बघायचे. फारच अविस्मरणीय आणि गमतीशीर दिवस होते ते.”
पुढे त्याने लिहिले, “ह्या सगळ्या शिकवणीचा अर्थ वय वाढत गेलं तसा उलगडायला लागला क्षेत्र कोणतं का असेना यश मिळवायचंय तर तपश्चर्येला पर्याय नाही. आज आम्ही दोघेही भावंडं त्यांनी दिलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवून आपापल्या क्षेत्रात मेहनतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत यश मिळो वा अपयश प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे सुरू असतात. आई म्हणत होती मुलाला पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअर मिळाला आणि आता मुलीला फोर्ब्स च्या टॉप ४० अंडर ४० मधे मान आज बाबा जाऊन १५ वर्ष झाली. ते आज असते तर त्यांना हे चित्र पाहून अतिशय आनंद झाला असता. तर माझ्या आई बाबांसारखाच मलादेखील माझ्या बहिणीचा प्रचंड अभिमान आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.”
अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चर्चेत; पोस्टरमध्ये दिसली भूल भुलैयाची झलक






