फोटो सौजन्य - Social Media
‘दशावतार’ हा मराठी चित्रपट कोकणातील कथा घेऊन आला असला, तरी त्यातील व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या महाकाय सिनेमाची प्रशंसा केली. “दशावतार ‘या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय,” असे उद्धवजी म्हणाले.
ठाकरे कुटुंबीयांसाठी ‘दशावतार’चा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, गायक अजय गोगावले, अभिनेते मिलिंद गुणाजी व राणी गुणाजी, तसेच जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. कार्यक्रमाला दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती. उद्धवजींनी सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले.
“कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहायला मिळाला आहे. ही भव्यता आणि सौंदर्य मोठ्या पडद्यावरच अनुभवता येते. त्यामुळे केवळ कोकणातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी ‘दशावतार’ सिनेमागृहात जाऊन जरूर पाहावा,” असे आवाहनही उद्धवजींनी केले. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीला ‘दशावतार’ने दिलेल्या भव्यतेबद्दल त्यांनी झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, ओंकार काटे यांच्यासह दिग्दर्शक सुबोध खानोलकर व सर्व निर्मात्या मंडळींचे विशेष अभिनंदन केले.