फोटो सौजन्य - Social Media
‘दशावतार’ या भव्य मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाने महाराष्ट्राबरोबरच गोवा, दिल्ली, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांत जबरदस्त यश संपादन केले आहे. पारंपरिक कोकणी लोककला रंगमंचावरून चित्रपटाच्या पडद्यावर आणून ती नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय या चित्रपटाला जाते. या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण टीमला विशेष आमंत्रण देऊन अभिनंदन केले. ते म्हणाले, “सिंधुदुर्ग, कारवार येथे मोठ्या प्रमाणात होणारा दशावतार हा कलाप्रकार गोव्यामध्ये देखील तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे”. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान केला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दशावतार चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींगही करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सर्व मान्यवरांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री स्तरावरून मिळालेल्या या सन्मानामुळे कलाकार व तंत्रज्ञांचा उत्साह अधिक वाढला आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कुडाळ व गोवा सीमेवर झाल्याने गोंयकर प्रेक्षकांनाही तो आपलासा वाटत आहे. कोकण व गोव्याची संस्कृती व परंपरा एकमेकांना जोडून ठेवतात, त्यामुळे गोव्याच्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत व ओशन फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर अशी दिग्गज कलाकारांची फळी झळकते.
कोकण-गोव्याच्या लाल मातीतील ही कलापरंपरा आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारतभर आणि परदेशातील रसिकांच्या मनालाही भिडते आहे. बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर यश मिळवत, हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतो आहे. विषय सार्वत्रिक असल्याने तो फक्त मराठी नव्हे, तर सर्व भाषिक प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.