(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड सध्या मालिकाविश्वात आपली वेगळी छाप पाडतो आहे. ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या सोहळ्यानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी अनेक किस्से, गमती-जमती सांगितल्या आहेत. त्याच दरम्यान, किरण गायकवाडने देखील त्याच्या स्वप्नातल्या घराबद्दल सांगितलं आहे.“गाव म्हटलं की, हल्ली माझ्या डोळ्यांसमोर कोकण येतं.”
किरणनं पुढे सांगितले की त्याला कोकणात त्याच्या स्वप्नातलं घर बांधायचे आहे. किरण याबद्दल म्हणाला, ”मला माझे ड्रीम होम कोकणात बांधायचं आहे. मी निसर्गाचे खूप आभार मानतो की, आपल्याला निसर्गानं खूप दिलंय. आणि मी निसर्गप्रेमी आहे. माझी अशी इच्छा आहे की, मला झाडं लावायची आहेत. मी ते सगळं भविष्यात करणार आहे.”
किरणचं हे कोकणप्रेम काही नविन नाही. त्याची पत्नी, अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही मूळची कोकणातील असून, दोघंही वेळ मिळेल तसं कोकणात जातात. ते त्यांच्या सहलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेतात.
किरण आणि वैष्णवी हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असून दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरच्या रील सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. किरण आणि वैष्णवी यांनी ‘देवमाणूस’ मालिकेच्या एका पर्वात एकत्र काम केले होते. त्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र स्क्रीनवर झळकले नाहीत. वैष्णवी सध्या तिची नवीन मालिका ‘काजळमाया’मुळे चर्चेत आहे. त्यामध्ये ती अभिनेता अक्षय केळकरबरोबर झळकणार आहे. लवकरच ही मालिका सुरू होणार आहे.
किरण गायकवाडने झी मराठी वरील मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप पाडली. ‘देवमाणूस’ मालिकेनं त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. आज किरण मराठी टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. अभिनयाबरोबरच आता त्याची निसर्गाशी नाळ जोडलेली स्वप्नं देखील लोकांना भावत आहेत.