मोठी बातमी! संपूर्ण इंडियाज गॉट लेटेंट' शो अडचणीत; 30-40 जणांवर गुन्हे दाखल
इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहबादियानं वादग्रस्त विधान चांगलंच महागात पडलं आहे. अश्लिल टिप्पणी केल्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. हा शो आता पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडला असून मोठी अपडेट समोर आली आहे. अलाहबादियाच्या या विधानामुळे संपूर्ण शो अडचणीत आला आहे. ३०-४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
इंडियाज गॉट लेटेंटचा वादग्रस्त एपिसोड याआधीच युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारनं निर्देश दिले होते. आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून युट्यूबवरून या शोचे सर्व एपिसोड हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट शोचे निर्माते बलराज घई, आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा यांच्यासह अन्य ३० ते ४० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडपासून ते सहाव्या एपिसोडपर्यंतचे सर्व होस्ट आणि गेस्टविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.महिला आयोगाने रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांना समन्स बजावले आहेत. सर्वांना १७ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. ही सुनावणी नवी दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात होणार आहे.
महाराष्ट्राच्या खार पोलिसांनी युट्यूबर आशिष चंचलानी यांचे जबाब नोंदवले आहेत. समय रैना देशाबाहेर आहे, त्याच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. रणवीर इलाहाबादियाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यात आला आहे. तो कधीही जबाबासाठी हजर राहू शकतो. खार पोलिस अजूनही तपास करत आहेत. पोलिस BookmyShow शी देखील संपर्क साधतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता, तो यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता आणि नंतर कोणीतरी तो रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, त्यानंतर तो व्हायरल झाला.
खरंतर, रणवीर इलाहाबादियाने अलीकडेच ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. या विधानाबाबत सोशल मीडियावर मोठा निषेध झाला, त्यानंतर इलाहाबादिया यांनी माफीही मागितली. तथापि, सामान्य नागरिकांसह खासदारांनीही त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.
या विधानाबाबत नोंदवलेला हा दुसरा गुन्हा आहे. एक दिवस आधी, आसाम पोलिसांनी युट्यूबर रणवीर इलाहाबादिया आणि विनोदी कलाकार समय रैना यांच्यासह इतरांविरुद्ध अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट आणि अश्लील चर्चा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.
महाराष्ट्र पोलिसांनी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना समन्स बजावले आहेत, तर काहींना चौकशीसाठी बोलावले जाईल. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अश्लील सामग्री प्रसारित करणे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडक मार्गदर्शक तत्वांची मागणी
महिला आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे की अशी सामग्री ‘महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा’, ‘भारतीय न्याय संहिता (BNS)’, ‘POCSO कायदा’ आणि ‘IT कायदा’ यासह अनेक कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करते. आयोगाने म्हटले आहे की अशा कंटेंटमुळे महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता धोक्यात येते आणि ती त्वरित थांबवावी.
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लील सामग्री रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती एनसीडब्ल्यूने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई करता यावी म्हणून या प्रकरणात उचललेल्या पावलांची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.