सूरज चव्हाणला ट्रोल करणाऱ्यांना केदार शिंदेंनी केली कानउघडणी; म्हणाले, "ट्रोलर्सना वेळीच थांबवलं पाहिजे, नाही तर..."
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापूक झुपूक’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाण स्टारर चित्रपट २५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्यापासून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने तीन दिवसांत ६७ लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाला दिलासादायक प्रतिसाद मिळत असताना, आज (२८ एप्रिल) सकाळी दिग्दर्शक केदार शिंदे इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत, त्यांनी सूरज चव्हाणला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ट्रोलर्सला खडेबोल सुनावत केदार शिंदे नेमके काय बोलले आहेत, जाणून घेऊया…
साऊथ सुपरस्टार अजित कुमार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित; कुटुंबासह दिल्लीला रवाना झाला अभिनेता!
इन्स्टाग्रामच्या लाईव्ह सेशनमध्ये, दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, ” श्री स्वामी समर्थ सर्वांना… आज मी लाईव्ह आलोय. माझं आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट. या चित्रपटाला प्रेक्षक दिलासादायक प्रतिसाद देताना दिसत आहे. मला आज या लाईव्हच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर बोलायचं आहे. सूरज चव्हाणला या चित्रपटाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. खरंतर, सूरजला ‘झापूक झुपूक’ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळं व्यासपीठ मिळालं. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी सर्वांनी सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. पण, मी काही नकारात्मक कमेंट्स सुद्धा वाचतोय.”
“काही लोक ठरवून सूरजबद्दल ही मतं मांडत आहेत. ती म्हणजे, हा माकडतोंड्या आहे, कसला दिसतो, याला काय येतं? बोबडा बोलतो अशा कमेंट्स लोक करत आहेत. पण, हे असं बोलणारे लोक सूरजने आतापर्यंत केलेली प्रगती पाहत नाहीयेत. त्याचा गावापासून सुरू झालेला प्रवास हा दृष्ट लागण्यासारखा आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना आताच आळा घातला पाहिजे. सूरजने या सगळ्या गोष्टींसाठी मला काही पैसे दिलेले नाहीयेत. तो स्वतः मेहनत घेऊन पुढे आला आहे. सूरज आजपर्यंत कसा होता यापेक्षा त्याने सिनेमात कसं काम केलंय हे पाहणं गरजेचं आहे. या ट्रोलर्सना वेळीच थांबवलं नाही तर, महाराष्ट्रातील गावाखेड्यातला मुलगा कधीच पुढे जाणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्याला पाठिबा देण्याची गरज आहे.”
“आज मी १७ सिनेमे केलेत आणि आताचा हा झापुक झुपूक माझा अठरावा सिनेमा आहे… मी प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलं आहे. एका युट्यूबरने टायटलमध्ये लिहिलं होतं. केदार शिंदेंनी जिओ सिनेमाला चुना लावला. पण, या चित्रपटासाठी आम्ही किती मेहनत घेतलीये हे त्यांनी पाहिलं नाही. ज्या लोकांनी सिनेमा पाहिलाय त्यांचाही खूप सकारात्मक आहे. माझं म्हणणं इतकंच आहे… सिनेमा पाहून ट्रोल करा, उगाच ट्रोल करू नका. तुम्ही सिनेमा न पाहता सूरजविषयी मत बनवू नका. आज सूरजसाठी वाईट वाटतंय कारण, त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. पण, लोकांनी ठरवून त्याला ट्रोल केलंय. सकाळी ९ चा पहिला शो असतो आणि अगदी सव्वा नऊला त्यांनी पहिला रिव्यू दिला.”
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने युके दौरा ढकलला पुढे, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!
“मला नवल वाटलं की, पंधरा मिनिटांत या लोकांनी संपूर्ण सिनेमा कसा पाहिला? म्हणजे ठरवून ठेवलं होतं की, सूरज चव्हाणला ठोकायचं, त्याचा सिनेमा फ्लॉप गेलाच पाहिजे हे ठरवूनच ठेवलं होतं. तुम्ही असं सूरजला वाईट ठरवू शकत नाही म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सर्वांशी आज लाइव्ह येऊन बोललो. मला चांगला अभिनय आणि वाईट अभिनय समजतो… कारण, एवढी वर्षे अनेक नटांना मी जवळून पाहिलंय. सूरजने त्याच्या पद्धतीने अप्रतिम काम केलं आहे. उगाच ट्रोल करू नका. त्याचे कष्ट बघा आणि मग बोला. एकदा सिनेमा पाहा आणि त्यानंतर नक्की फिडबॅक द्या.” असं केदार शिंदेंनी यावेळी सांगितलं.