(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘द ट्रॅप’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर हे केवळ एक दृश्य नसून, एका गूढ आणि अंधाऱ्या खेळाची झलक देणारा पहिला इशारा आहे. गडद सावल्या, शांत पण अस्वस्थ करणारी नजर आणि काहीतरी दडवलेले असल्याची जाणीव या सगळ्यांमुळे पोस्टर पाहताच एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘द ट्रॅप’ हे नाव जरी साधं वाटलं तरी त्यामागचा अर्थ खूप खोल आहे. एकदा या जाळ्यात अडकल्यावर सुटणं अशक्य, आणि प्रत्येक पात्र काही ना काही लपवतंय असा अंदाज या पोस्टरमधूनच प्रेक्षकांना येतो आहे.
‘आज मी अनाथ झालोय…’ Anurag Dobhal चा धक्कादायक खुलासा; ICU मधून बाहेर पडताच शेअर केली पोस्ट
नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये हार्दिक जोशीचा लूक अत्यंत गंभीर आणि रहस्यमय दिसतो आहे. बॅकग्राउंडमधील गडद रंगछटा आणि सस्पेन्सची झलक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार, याची खात्री वाटते.
या चित्रपटाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे नवोदित अभिनेता सुजित जाधव यांचे पदार्पण झाले आहे. पहिल्याच चित्रपटात हार्दिक जोशी यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पोस्टरमधील त्यांची झलकही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय चित्रपटात मोहन जोशी, संजय खापरे, श्याम मोहिते आणि स्वाती लिमये यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘The Trap’ या चित्रपटाची निर्मिती योगेश रामचंद्र जाधव यांनी केली आहे, तर कथा आणि दिग्दर्शन अमोल लक्ष्मण खापरे यांनी केली आहे. पटकथा, संवाद आणि गीते अभिजीत कोलेकर यांनी लिहिली असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन निरंजन पटकी यांनी सांभाळले आहे. संगीतकार नितीन उगलमुगले यांनी दिलेल्या पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा थरार अधिकच वाढणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला की, “या चित्रपटातून मला एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आजवर अशा प्रकारचा सस्पेन्स थ्रिलर माझ्या वाट्याला आला नव्हता, त्यामुळे ही संधी मी पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न केला आहे.” एकूणच, ‘The Trap’ हा केवळ सस्पेन्स थ्रिलर नसून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा, विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत थरार कायम ठेवणारा चित्रपट ठरणार आहे. १० एप्रिल २०२६ पासून हा रहस्यांनी भरलेला खेळ उलगडणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन हा चित्रपट देत आहे.






