
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुप्रतिक्षित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाच्या टीझर आणि शीर्षक गीताने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि आता प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत भर घालत या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच एका अनोख्या पद्धतीने पार पडला आहे. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा असल्याने या सोहळ्याला उपस्थित सर्व महिला पत्रकार, चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममधील महिला यांच्याद्वारे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. हा क्षण या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. तसेच यादिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस असल्याने संपूर्ण टीमने केक कापून तिचा वाढदिवसही साजरा केला आहे.
सासू सुनेचं नातं हे अनेक कुटुंबात तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या प्रकारचं असतं.. तर काहींसाठी ‘सून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्वरूपाचं असतं. थोडक्यात, घरोघरी मातीच्या चुली अशी परिस्थिती प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळत असते. याहीपलिकडे जाऊन त्यांच्यात एक असाही भावनिक बंध असतो जो या नात्याची वीण कधीच सैल होऊ देत नाही. अशाच काहीशा भावना मांडणारा आणि या नात्याचे नवे पैलू उलगडणारा चित्रपट म्हणजे अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई ? हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
ट्रेलरमध्ये सासू -सूनेच्या नात्याचे केवळ आदर्श रूप नाही, तर त्यातील चांगले-वाईट पैलू, संघर्ष आणि भावनिक क्षणही प्रामाणिकपणे मांडण्यात आले असून, हसवत हसवत विचार करायला लावणारी ही कथा आहे. ही केवळ एक सासू-सूनेची गोष्ट नसून स्त्रियांची गोष्ट आहे. स्त्रियांनी एकमेकींना समजून, एकमेकींची साथ दिल्यावर त्या अधिक सक्षम व मजबूत होतील असा प्रभावी विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस!
दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा एक मनोरंजक आणि कौटुंबिक चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा चित्रपट घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे. प्रेक्षकांना या नात्यातील गंमतीदार प्रसंग, भावनिक वळणे आणि दोन्ही व्यक्तिरेखांची ताकद अनुभवता येईल.”
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.