
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचं बजेट कोटींमध्ये आणि कमाई फक्त...
मराठी चित्रपटसृष्टीतील काही उत्तम चित्रपटांच्या यादीत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चे नाव आवर्जून घेतले जाते. 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले. 2009 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 25 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 2025 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रदर्शित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. अखेर 31 ऑक्टोबर 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चला जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे?
खुद्द Charlie Chaplin झाला ‘या’ मराठी चित्रपटाचा चाहता! व्ही. शांताराम यांचं होतं दिग्दर्शन
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा यंदाच्या वर्षातील मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटपैकी एक मानला जातोय. नुकतेच कॅच अप या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाविषयी अनेक रोचक गोष्टी सांगितल्या. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी सुरुवातीला साडेसात ते आठ कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले होते. मात्र, निर्मिती प्रक्रियेदरम्यान खर्च वाढत जाऊन हा चित्रपट तब्बल 13 कोटींच्या बजेटवर पोहोचला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक घोडा दाखवण्यात आला असून, त्यासोबत आणखी एक घोडा आहे. या दोन घोड्यांचे भाडेच सुमारे 19 लाखांपर्यंत गेले, असे मांजरेकरांनी सांगितले.
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लाखोंची कमाई करत चांगली सुरुवात केली आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने सुमारे 20 लाख रुपयांची कमाई केली. आगामी विकेंडदरम्यान या आकड्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत चांगली उडी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अनेक चित्रपटसमीक्षक आणि कलाकारांनी या सिनेमाचे कौतुक केले असून प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.