फोटो सौजन्य: X.com
भारतीय सिनेसृष्टीचे नाव आज जगभरात गाजले जात आहे. त्यात OTT आल्याने तर विविध भाषेतील भारतीय चित्रपट जगभरात नावाजले जात आहे. खरंतर, या भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात केली ती मराठी माणसानेच. पुढे भारताचे नाव गर्वाने उंचावणारे अनेक चित्रपट मराठी दिग्दर्शकांनी दिले. असेच एक मोठे दिग्दर्शक म्हणजे व्ही. शांताराम.
18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापूरमध्ये व्ही शांताराम यांचा जन्म झाला. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘धर्मात्मा’, ‘पिंजरा’, ‘नवरंग’, ‘कुंकू’, ‘अमर भुपाळी’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ सारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिले. मात्र, त्यांच्या एका चित्रपटाने थेट सातासमुद्रापार झेप घेतली. ती झेप थेट महान अभिनेता चार्ली चॅप्लिन यांच्यापर्यंत पोहोचली.
1939 साली व्ही. शांताराम यांचा ‘माणूस’ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा विषय इतका धाडसी आणि गंभीर होता की थेट चार्ली चॅप्लिन पर्यंत हा चित्रपट पोहोचला. हा चित्रपट पाहिल्यानंतर खुद्द चार्ली चॅप्लिनने देखील या मराठी चित्रपटाचे आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे मनभरून कौतुक केले. असे पहिल्यांदाच घडले की एका नावाजलेल्या अभिनेत्याने मराठी चित्रपटाचे कौतुक केले.
”माझ्या आयुष्यातील देवमाणूस…”, सिद्धार्थ जाधवची महेश मांजरेकरांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला….
हा चित्रपट चार्ली चॅप्लिनला आवडला याचे कारण म्हणजे चित्रपटाचा धाडसी विषय. या चित्रपटाचा विषय असा आहे की एक पोलीस हवालदार चक्क एका वेश्याच्या प्रेमात पडतो. दोघांमध्येही प्रेम फुलू लागते. जेव्हा ही गोष्ट समाजाला कळते तेव्हा तो हवालदार तिला आपलेसे करतो. मात्र, समाजाला ही गोष्ट मान्य नसते. हाच विषय प्रेक्षकांना सुद्धा भावला. ‘माणूस’ चित्रपट हिंदीत देखील बनवला गेला ज्याचे नाव ‘आदमी’ असे होते.
व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते होते. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. मराठी आणि हिंदी चित्रपटांना कलात्मक उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये वास्तव, सामाजिक संदेश आणि सौंदर्य यांचा उत्कृष्ट संगम दिसतो. व्ही. शांताराम यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.






